
केंद्र सरकारने लष्कराला आणखी मजबूत करण्यासाठी पावले उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणून सरकारने 2.38 लाख कोटी रुपयांच्या संरक्षण कराराला मंजुरी दिली आहे. डिफेन्स एक्विजिशन काऊंसिल (डीएसी)ने रशियाकडून आणखी पाच एस-400 लांब पल्ल्याची सरफेस टू एअर मिसाईल सिस्टम खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. एस-400 ने ‘ऑपरेशन सिंदूर’वेळी आपली क्षमता दाखवली होती. डीएसीने अनेक महत्त्वाच्या खरेदी प्रस्तावालाही मंजुरी दिली आहे. ज्यात हिंदुस्थानी वायूदलासाठी मध्यम ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आणि रिमोटने चालणारे स्ट्राइक एअरक्राफ्टच्या खरेदीचा समावेश आहे. तसेच लष्करासाठी आर्मर्ड पियार्ंसग टँक दारूगोळा आणि धनुष गन सिस्टम खरेदी केली जाणार आहे. या सर्व प्रस्तावांची एकूण किंमत 2.38 लाख कोटी इतकी आहे.
एस-400 साठी मंजुरी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन हिंदुस्थान दौऱयावर आल्यानंतर चार महिन्यांनंतर मिळाली आहे. 2018 मध्ये हिंदुस्थानने रशिया सोबत एस-400 चे पाच स्क्वाड्रन खरेदीसाठी 5.43 अब्ज डॉलरचा करार केला होता. यात तीन स्क्वाड्रन मिळाले आहेत. याला पाकिस्तानलगत सीमांवर तैनात करण्यात आले आहे.
लष्करासाठी डीएसीने एअर डिफेन्स ट्रक्ड सिस्टम, आर्मर्ड पियार्ंसग टँक दारूगोळा, धनुष गन सिस्टम, जास्त क्षमतेचे रेडिओ रिले आणि रनवेवर अवलंबून नसलेल्या हवाई देखरेख सिस्टम खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. हिंदुस्थानी तटरक्षक दलासाठी एअर कुशन वाहनांसाठी आवश्यक मंजुरी देण्यात आली आहे. या वाहनांचा वापर समुद्री किनारी मोहिमेसाठी केला जाईल. यात वेगवान किनारी गस्त, शोध आणि बचाव मोहीम, जहाजांना मदत करणे यांचा समावेश आहे.
मध्यम ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टला खरेदी केल्यानंतर ते जुन्या झालेल्या एन-32 आणि 11-76 विमानांची जागा घेतील, असे संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. रिमोटने चालणारे स्ट्राइक एअरक्राफ्टचे किती स्क्वाड्रन खरेदी केले जाणार आहेत, याची अधिकृत माहिती देण्यात आली नाही. परंतु सात ते आठ असतील, असे सूत्रांनी सांगितले.
























































