लिपस्टीक आणि काजळ लावून तरुणाने फोटो शेअर केला, कारण जाणून घ्याल तर तुम्हीही कौतुक कराल

सोशल मीडिया ही दुधारी तलवार आहे. इथल्या पोस्ट किंवा फोटो व्हिडीओंवर चांगल्या प्रतिक्रिया येतात तशाच वाईट प्रतिक्रिया देखील येतात. मात्र हेच साधन अनेकदा अन्यायाला वाचा फोडण्यासाठी किंवा आपले म्हणणे प्रभावीपणे मांडण्यासाठीही वापरता येतं. वास्तवात घडलेल्या एका प्रकारानंतर एका तरुणाने लिपस्टीक आणि काजळ लावून त्याचा फोटो फेसबुकवर शेअर केला. सुरुवातीला त्याचा हा फोटो पाहून तो समलिंगी असावा असा अनेकांना समज होऊ शकतो, मात्र या फोटोमागचे सत्य वेगळेच आहे.

पुष्पक सेन असं या तरुणाचं नाव आहे. दाढी वाढवलेल्या या तरुणाने लिपस्टीक आणि काजळ लावून फोटो शेअर केला तेव्हा अनेकांना धक्का बसला होता. मात्र त्याने असा फोटो का काढला आणि शेअर का केला याचं त्यानेच कारण सांगितलं आहे.

My mother, a woman of 54 years, got slutshamed, by some of our nearest relatives, for wearing a red lipstick at a family…

Posted by Pushpak Sen on Monday, November 9, 2020

पुष्पकने हा फोटो 9 नोव्हेंबर रोजी शेअर केला होता. या फोटोखाली त्याने लिहिलं होतं की “माझी आई 54 वर्षांची आहे. एका कौटुंबिक कार्यक्रमात आमच्या जवळच्या नातेवाईकांनी तिली लाल लिपस्टीक लावल्याबद्दल खिल्ली उडवली. त्यांना मी हा फोटो गेट वेल सून या संदेशासह पाठवून दिला आहे”

पुष्पकने या पोस्टमध्ये म्हटलंय की अशा मुद्दांवर आमच्या या नातेवाईकांची मुलं खूप बोलतात मात्र या विषयावर त्यांनी चकार शब्द काढला नाही याचं मला आश्चर्य वाटतंय. माता, भगिनी,मुली, पुरुष, महिला ज्यांना समाजाच्या संकुचित विचारसरणीमुळे असुरक्षित वाटतं त्यांच्यासाठी मी उभा आहे हे दाखवून देण्यासाठी मी दाढी वाढवलेल्या अवस्थेत आणि लिपस्टीक लावलेला फोटो शेअर करत असल्याचं पुष्पकने म्हटलंय. पुष्पकने सगळ्या पुरुषांना आवाहन केलं आहे की ते ज्या महिलांना ओळखतात त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं रहावं.

पुष्पकच्या या पोस्टला 11 हजाराहून अधिक लाईक्स किंवा इतर रिअॅक्शन मिळाल्या आहेत. त्याची ही पोस्ट 3 हजारांपेक्षा अधिक जणांनी शेअर केली असून ही संख्या वाढतेच आहे. अनेकजण त्याच्या या फोटोखाली असलेल्या प्रतिक्रियांच्या रकान्यात आपले मत व्यक्त करताना दिसत असून त्यांनी पुष्पकला पाठिंबा दर्शवला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या