
दोन वेळा चॅम्पियन ठरलेली हिंदुस्थानची स्टार खेळाडू पी. व्ही. सिंधू यंदाच्या मलेशिया मास्टर्स सुपर 500 बॅडमिंटन सर्धेत सलामीलाच गारद झाली. मात्र एच. एस. प्रणॉय व सतीश करुणाकरण या हिंदुस्थानी खेळाडूंनी विजयी सलामी दिली. याचबरोबर हिंदुस्थानच्या आयुष शेट्टीनेही विजयारंभ केला.
दोन वेळच्या ऑलिम्पिक विजेत्या पी. व्ही. सिंधूला व्हिएतनामच्या गुयेन थुई लिन्ह हिने 21-11, 14-21, 21-15 असे हरविले. सिंधूने दुसरा गेम जिंकून लढतीत पुनरागमन केले होते, मात्र तिसऱया व निर्णायक गेममध्ये ती पुन्हा ढेपाळली अन् पराभूत झाली. 2009 पासून सुरू झालेल्या या स्पर्धेत सिंधूने दोन वेळा महिला एकेरीचे विजेतेपद पटकाविलेले आहे, मात्र यावेळी तिच्यावर सलामीलाच गारद होण्याची नामुष्की ओढावली. सायना नेहवाल व एच. एस. प्रणॉय या हिंदुस्थानी खेळाडूंनीही एकेकदा ही स्पर्धा जिंकलेली आहे.
दुसरीकडे पुरुष एकेरीत एचएस प्रणॉयने पाचव्या मानांकित जपानच्या पेंटा निशिमोटो याचा 19-21, 21-17, 21-16 असा पराभव करीत दुसऱया फेरीत प्रवेश केला. ही लढत एक तास 22 मिनिटांपर्यंत रंगली. याचबरोबर सतीश करुणाकरणने तृतीय मानांकित चिनी तैपेईच्या चोऊ टिएन चेनचा अवघ्या 39 मिनिटांत 21-13, 21-14 असा सरळ गेममध्ये धुव्वा उडवित धक्कादायक निकाल नोंदविला. एवढेच नव्हे, तर आयुष शेट्टीनेही कॅनडाच्या ब्रायन यांगचा 20-22, 21-10, 21-8 असा पराभव केला.