ऑफिसचा कप ठेवण्यावरून लाथा-बुक्क्या-शिविगाळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पिंपरी

कॉफीचा कप ठेवण्याच्या कारणावरून कॅन्टीनमध्ये काम करणाऱ्या कामगाराने आपल्या दोन साथीदारांसह दोघांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. नाणेकरवाडी, चाकण येथील मिंडा कॉप लिमिटेड कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर काल (दि. ६) सायंकाळी सव्वासातच्या सुमारास ही घटना घडली.

दत्तात्रय कारंडे (वय २९, रा. कुरळी, डोंगरवस्ती, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नाणेकरवाडी, चाकण येथे मिंडा कॉप लिमिटेड ही कंपनी आहे. फिर्यादी आपला मित्र जितेंद्र महाजन याच्यासह या कंपनीतील कॅन्टीनमध्ये कॉफी पिण्यास गेले होते. कॉफी संपल्यानंतर त्यांनी कॅन्टीनमध्ये काम करणाऱ्या अक्षय (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) नावाच्या कामगाराला कप ठेवण्यास सांगितले. त्यातून दोघांच्यात वाद झाला. हा राग मनात धरून अक्षय आणि त्याच्या दोन साथीदारांनी कंपनीच्या प्रवेशद्वारावर फिर्यादी कारंडेच्या डोक्यावर हेल्मेट मारून दुखापत केली. भांडण सोडविण्यास गेलेल्या फिर्यादीच्या मित्र महाजनलाही त्यांनी धक्का-बुक्की केली. त्यानंतर दोघांनाही शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आणि दमदाटी केली.