
सामना ऑनलाईनस नवी दिल्ली
नववर्षाच्या सुरुवातीलाच काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला असून राफेल प्रकरणावरून ‘ऑडिओ बॉम्ब’ टाकला आहे. ‘राफेल’ प्रकरणातील सर्व फायली माझ्या बेडरूममध्ये आहेत, असा दावा गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोवा मंत्रिमंडळ बैठकीत केला होता, अशी माहिती देतानाच काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाल यांनी एक ऑडिओ टेप जारी केली आहे. गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे आणि एका अज्ञात व्यक्तीत झालेल्या संभाषणाची ही टेप आहे.
माजी संरक्षण मंत्री असलेल्या मनोहर पर्रीकर यांच्याकडे राफेल प्रकरणाच्या कोणत्या फायली आहेत, त्यांच्याकडे कोणते गुपित आहेत? पर्रीकर यांचे विधान म्हणजे राफेल प्रकरणात घोटाळा झाल्याचे स्पष्ट होते. 10 एप्रिल 2015ला पॅरिसमध्ये पंतप्रधान मोदी यांनी राफेल कराराची घोषणा केली तेव्हा संरक्षण मंत्री असलेले पर्रीकर गोव्यात मासे खरेदी करीत होते, असे सुरजेवाला यांनी सांगितले.
ऑडिओ क्लिपमधील संभाषण
- अज्ञात व्यक्ती – गुड इव्हिनिंग सर.
- विश्वजीत राणे – बॉस, गुड इव्हिनिंग.
- आज तीन तासांची कॅबिनेट बैठक झाली.
- अज्ञात व्यक्ती – ओके.
- विश्वजीत राणे – याला गुपितच ठेवा.
- अज्ञात व्यक्ती – हो… हो…
- विश्वजीत राणे – आज खूप गदारोळ झाला. नीलेशने त्यांच्या क्षेत्रातील जास्त इंजिनीअर घेतले आहेत. जयेश साळगावकर यांना यादी मिळाली आहे. प्रत्येक जण त्याच्याशी भांडतोय. नियुक्ती न मिळाल्याने अनेक जणांनी नाराजी व्यक्त केली आहे.
- अज्ञात व्यक्ती – ओके.
- विश्वजीत राणे – बापू सुदीन ढवळीकरसोबत वाद घालत होता.
- अज्ञात व्यक्ती – ओके.
- विश्वजीत राणे – आजच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले. ते म्हणाले, राफेल प्रकरणाची सर्व माहिती माझ्या बेडरूममध्ये आहे.
- अज्ञात व्यक्ती – काय सांगताय?
- विश्वजीत राणे – मी आपल्याला सांगतोय…
- अज्ञात व्यक्ती – हे भगवान…
- विश्वजीत राणे – मी फक्त तुम्हाला ही गोष्ट सांगितली आहे.
मी असे बोललोच नाही – पर्रीकर
मी अशा प्रकारे कोणाशीही कधी बोललेलो नाही. ऑडिओ टेपमध्ये जे संभाषण आहे त्याला कोणताही आधार नाही. अशा प्रकारची कोणतीही चर्चा गोवा मंत्रिमंडळाच्या बैठकीत किंवा अन्य बैठकीत झालेली नाही, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. ‘राफेल’बाबत सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला त्यावरून काँग्रेसच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश झाला आहे. त्यामुळे नवे पुरावे तयार करण्याची केविलवाणी धडपड काँग्रेस करत आहे, असा आरोप पर्रीकर यांनी केला. दरम्यान, ऑडिओ टेपमध्ये आवाज असलेले आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनीही ऑडिओ टेप बनावट असून या प्रकरणी चौकशी करावी, अशी मागणी राणे यांनी केली आहे.




























































