शिर्डीतील सभेत नितीन गडकरी यांना भोवळ; प्रकृती स्थिर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । राहाता

शिर्डी लोकसभा मतदारसंघात राहाता येथे प्रचारसभेत संबोधित करत असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना अचानक भोवळ आली. गडकरी भाषण आवरते घेऊन खुर्चीवर बसले व स्वतःजवळील औषध घेतले. गडकरी यांची प्रकृती स्थिर असून साईबाबांचे दर्शन घेऊन ते विमानाने नागपूरला रवाना झाले.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी नितीन गडकरी यांची राहाता येथे सभा होती. सभास्थळी येताच गडकरी यांना दोनदा लिंबूपाणी देण्यात आले. त्यानंतर मतदारांना संबोधित करण्यासाठी ते उभे राहिले. भाषणाच्या समारोपाकडे असताना गडकरी यांना अचानक चक्कर आल्यासारखे झाले. त्यांनी भाषण आवरते घेतले आणि ते खुर्चीवर बसले. प्रकृती स्थिर झाल्यानंतर ते उठून उभे राहिले आणि मतदारांना हात उंचावून अभिवादन करून सभास्थानावरून रवाना झाले. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी राहुरी कृषी विद्यापीठाच्या कार्यक्रमात गडकरी यांना असाच त्रास झाला होता.

नगर जिह्यात पारा 44 अंशांवर गेला आहे. कडाक्याचे ऊन आहे. गडकरी यांना शुगर आहे. शिर्डी विमानतळावर गडकरी यांच्या प्रकृतीची तपासणी डॉ. बनसोडे आणि डॉ. शिंदे यांनी केली. रक्तदाब आणि शरीरात पाणी कमी झाल्याने भोवळ आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.