सरकारच्या दूध दरवाढीची घोषणा हवेतच

22

सामना प्रतिनिधी। राहाता

दूध दरवाढीच्या सरकारच्या घोषणेला दूध संघ व खाजगी दूध डेअरी चालकांकडून वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या असून दर वाढवण्या ऐवजी कमी डिग्री व फँट चे कारण दाखवून दर घटवले आहेत. सरकारच्या 25 रूपये दुध दराच्या घोषणेनंतरही राहाता तालुक्यात शेतकऱ्यांच्या पदरात मात्र 9, 10, ते 15 रूपये दर पडत आहेत. यामुळे दूध उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.

receipt-2

गेल्या महिन्यात दूध दरवाढीसाठी राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी लाखो लिटर दूध रस्त्यावर ओतले. शेतकऱ्यांनी मोठे नुकसान या काळात सोसले. याची दखल घेत सरकारने 1 ऑगस्ट पासून दूधाचा दर 25 रूपये करण्यात आल्याची घोषणा केली. दूधउत्पादकांना दर वाढल्याचा आनंद झाला. मात्र एक ऑगस्ट नंतर आलेल्या पहिल्या दूधाच्या पगाराचे भाव पाहून हिरमोड झाला. दर तर वाढले नाही मात्र डिग्री, फँट व एसएनएफ मुळे पूर्वी जे दर मिळत होते त्यातही घट झाली. यामुळे दूध उत्पादकांचे अतोनात नुकसान झाले.

केंद्र सरकारच्या नव्याने लागू केलेल्या दुधाच्या एसएनएफ निकषामुळे दुधसंघांना व खाजगी डेअरी चालकांना शेतकऱ्यांची पिळवणुक करण्याचा एक प्रकारे परवानाच दिल्याचा आरोप दुध उत्पादक शेतकरी करत आहे. अनेक संस्थांमधे शेतकऱ्यांचे दूध स्वीकारताना फँट व डिग्री मधे गडबड केली जात असल्याने दर मिळत नसल्याच्या तक्रारी शेतकरी करत आहे. एकाच दूधाची तपासणी वेगवगळ्या ठिकाणी केली तर त्यात तफावत येते. कमी डिग्री व कमी फँट असल्याचे दाखवून शेतकऱ्यांच्या दुधाला कवडी मोल दर दिला जात आहे. राहाता तालुक्यातील 1 ऑगस्ट नंतर अनेक गावांत हे चित्र पाहायला मिळत आहे. काही दूध उत्पादक शेतकऱ्यांना 8 ते 10 रूपये इतका दर दिल्याचे शेतकऱ्यांनी दाखविले सरासरी 15 ते 18 रूपयेच दर आजही शेतकऱ्यांच्या पदरात पडताना दिसत आहे. त्यामुळे सरकारचीच घोषणा व सरकारचेच निकष शेतकऱ्यांच्या मुळावर उठताना दिसत आहे.

receipt-23

पाऊस नाही चारा नाही अशा परिस्थितीत विकत चारा घेऊन दुभती जनावरे सांभाळणे म्हणजे शेतकऱ्याला तारेवरची कसरत करावी लागत आहे. महागडे खाद्य औषध उपचार व दूध विक्रीतून मिळणारे पैसे याचा कुठेच ताळमेळ बसत नसल्याने दुध धंदा व त्यावर अवलंबून असणारे शेतकरी हतबल झाले आहे. सरकार घोषणा करते पण शेतकऱ्याच्या पदरात काहीच पडत नाही. याही वेळेला तेच झाले.

आपली प्रतिक्रिया द्या