
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इव्हेंट मॅनेजर आहेत. सध्या देशाला इव्हेंटची नाही तर धोरणाची गरज आहे. याच पद्धतीने आणि गतीने लसीकरण सुरू राहिले तर देशात तिसरी, चौथी आणि अनेक कोरोनाच्या लाटा येतील, असा हल्लाबोल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. पंतप्रधानांना कोरोना समजलेला नाही. त्यांच्या नौटंकी आणि बेजबाबदारपणामुळेच देशात दुसरी लाट आली, असा घणाघातही राहुल गांधींनी केला.
राहुल गांधी यांची व्हर्च्युअल पत्रकार परिषद झाली. या वेळी कोरोना व्यवस्थापनातील मोदी सरकारच्या त्रुटी दाखवतानाच जोरदार टीकास्त्र सोडले. देशात लसींची गरज असताना परदेशात लसपुरवठा करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
काय म्हणाले राहुल गांधी?
- कोरोनाच्या पहिल्या लाटेचा अंदाज कोणालाच आला नव्हता, पण दुसरी लाट रोखणे ही केंद्र सरकारची जबाबदारी होती. पण पंतप्रधान मोदी नौटंकी करत राहिले. त्यांच्या बेजबाबदारपणामुळे देशात दुसरी लाट आली. दुसऱ्या लाटेला पंतप्रधानच जबाबदार आहेत.
- आपल्या देशात मोठी अडचण म्हणजे लसीकरणासंदर्भात काही धोरणच नाही. पंतप्रधान इव्हेंट मॅनेजर आहेत. एका वेळेस ते एकाच इव्हेंटचा विचार करतात. देशाला इव्हेंटची नाही धोरणाची गरज आहे. इव्हेंटने लोकांचे प्राण जातील.
- देशातील केवळ तीन टक्के लोकांचे लसीकरण झाले आहे. त्यामुळे 97 टक्के लोकांना कोरोना संसर्ग होऊ शकतो. याच गतीने हे सुरू राहिले तर लसीकरण पूर्ण होण्यासाठी 2024 चा मे महिना उजडेल.
- कोरोना हा व्हायरस आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंग, मास्क हे तात्पुरते उपाय आहेत. प्रभावी उपाय फक्त लसीकरण आहे. मोदी सरकारने लसीकरणाबाबत योग्य धोरण आखून अंमलबजावणी केली नाही तर देशात तिसरी, चौथी अशा अनेक कोरोनाच्या लाटा येतील.




























































