थाळी बडवणे झाले, इव्हेंटबाजी थांबवून जनतेला लस पुरवा; राहुल गांधी यांचा केंद्रावर हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभरात अनेक भागात कोरोना लसीची टंचाई जाणवत आहे. त्याविरोधात काँग्रेसने मोहिम सुरू केली आहे. देशातील प्रत्येकाला कोरोनाची लस मिळावी यासाठी काँग्रेसने ही मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेद्वारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी केंद्र सरकारवर कडाडून हल्ला चढवला आहे.

385 दिवसानंतरही कोरोनाशी लढाई जिंकण्यात यश आलेले नाही. उत्सव, टाळी, थाळी खूप झाले आता इव्हेंटबाजी थांबवून देशातील प्रत्येकाला लस देण्यात यावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी व्हिडीओमध्ये केली आहे. ही लढाई 18 दिीवसात जिंकू असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. त्यांनी टाळ्या, घंटी, थाळ्या वाजवायला सांगितल्या. लाईट बंद करायला सांगितले.

हे सर्व करूनही कोरोना वाढतच गेला. आता कोरोनाची दुसरी लाट आली आहे. ती धोकादायक असून त्यात अनेकांचे बळी गेले आहेत. देशातील कोरोनाची स्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. आता इव्हेंटबाजी थांबवून देशातील नागरिकांना लसीचा पुरवठा करा, असे ते म्हणाले. कोरोनाची लस देशाबाहेर पाठवणे थांबवा आणि देशातील गरजूंना लसीचा पुरवठा करा, अशी मागणीही त्यांनी केली.

प्रियंका गांधी यांनीही या मोहिमेद्वारे ट्विट केले आहे. लस सर्वासाठी हवी, त्यात जुमलेबाजी करू नये, इव्हेंटपेक्षा सरकारने जनतेकडे लक्ष द्यावे. पीएम केअर फंडच्या नावाने जमवलेले पैसे नेमके कोठे आणि कशासाठी खर्च केले, ते जाणून घेण्याचा जनतेला अधिकार आहे., असे त्यांनी म्हटले आहे. कोरोना लसीच्या टंचाईमुळे अनेक राज्यात लसीकरण थांबले आहे. त्यामुळे सरकारने लसीची निर्यात थांबवून देशात त्याचे वितरण करावे, अशी मागणी होत आहे.