
देशाचा आर्थिक कणा असलेल्या शेतकऱ्याकडे आत्महत्येशिवाय पर्याय राहिलेला नाही. शेतकरी रोज कर्जात बुडत चालला आहे. बियाणे, खते, डिझेल महागले आहे. परंतु, पिकांना किमान हमीभावाची कुठल्याही प्रकारची गॅरंटी नाही. जेव्हा शेतकरी कर्जमाफीची मागणी करतात तेव्हा मोदी सरकार त्याकडे दुर्लक्ष करते. शेतकरी मरताहेत आणि मोदी सरकार केवळ तमाशा बघतेय, अशा शब्दांत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी आणि फडणवीस सरकारवर घणाघाती आरोप एक्सवरील पोस्टद्वारे केला आहे.
गेल्या तीन महिन्यात महाराष्ट्रात तब्बल 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. हा केवळ आकडा नाही तर 767 घरे उद्ध्वस्त झाली. असे असताना सरकार गप्प आहे. केवळ बघ्याची भूमिका घेत आहे, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झालेच नाही, त्यांचे आयुष्य अर्धे झाले
ज्यांच्याकडे करोडो आहेत त्यांचे कर्ज मोदी सरकार लगेच माफ करते. अनिल अंबानींचेच 48 हजार कोटी रुपयांचे एसबीआय फ्रॉड बघा ना, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन मोदींनी दिले होते. आज शेतकऱ्यांचे आयुष्यच अर्धे झाले आहे. सरकारची यंत्रणा शेतकऱ्यांना मारतेय अगदी गुपचूप, परंतु, मोदी आपलीच प्रसिद्धी करून जे सुरू आहे तो तमाशा पहात आहे, असा हल्ला राहुल गांधी यांनी केला आहे.