तडजोड केलेल्या पंतप्रधानांचे मौन लज्जास्पद आहे, राहुल गांधी यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदुस्थानच्या परराष्ट्र धोरण आणि ऊर्जा सुरक्षेच्या मुद्द्यावर केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. 11 फेब्रुवारी 2026 रोजी लोकसभेत केलेल्या भाषणाचा उल्लेख करत त्यांनी आज सोशल मीडियावर पुन्हा सरकारवर निशाणा साधला.

राहुल गांधी यांनी सांगितले की, 11 फेब्रुवारी 2026 रोजी लोकसभेत बोलताना त्यांनी हिंदुस्थानच्या ऊर्जा सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा दिला होता. त्या वेळी त्यांनी म्हटले होते की, “अमेरिका आपल्याला सांगेल की आपण कोणाकडून तेल खरेदी करू शकतो किंवा करू शकत नाही. ते रशिया असो किंवा इराण, हा निर्णय अमेरिका घेईल. पण आपल्या पंतप्रधानांनी तो निर्णय घेणार नाहीत.”

आज सोशल मीडियावर पोस्ट करत राहुल गांधी म्हणाले की, हिंदुस्थानचे परराष्ट्र धोरण हे देशातील जनतेच्या सामूहिक इच्छेतून निर्माण व्हायला हवे. ते आपल्या इतिहास, भौगोलिक वास्तव आणि सत्य व अहिंसा या आध्यात्मिक मूल्यांवर आधारित असले पाहिजे.

मात्र सध्या जे घडत आहे ते परराष्ट्र धोरण नसून एका तडजोड केलेल्या व्यक्तीच्या शोषणाचा परिणाम आहे, अशी टीका त्यांनी केली. ऊर्जा सुरक्षेच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी “तडजोड केलेल्या पंतप्रधानांचे मौन लज्जास्पद आहे,” असेही म्हटले.

राहुल गांधी यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरण आणि ऊर्जा सुरक्षेच्या मुद्द्यावर राजकीय वाद रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.