‘पंतप्रधान मोदींना मणिपूरपेक्षा इस्रायलमध्ये जास्त रस आहे’; राहुल गांधीची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आणि पंतप्रधानांना मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारापेक्षा इस्रायल-हमास युद्धात जास्त रस असल्याचं म्हटलं आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त राहुल गांधी हे मिझोरममध्ये आहेत. तिथे बोलताना राहुल गांधी म्हणाले, ‘माझ्यासाठी ही बाब आश्चर्यकारक आहे की पंतप्रधान आणि हिंदुस्थान सरकारला इस्रायलमध्ये काय घडत आहे याबद्दल खूप रस आहे परंतु मणिपूरमध्ये काय घडत आहे याबद्दल त्यांना अजिबात रस नाही.’

राहुल गांधी यांनी जूनमधील आपल्या मणिपूर भेटीचा उल्लेख केला आणि त्यांनी जे पाहिलं त्यावर विश्वास बसत नसल्याचं सांगितलं. ‘मणिपूरची कल्पना भाजपनं नष्ट केली आहे. ते आता एक राज्य राहिलेले नाही, ती आता दोन राज्ये झाली आहेत’, असं देखील गांधी म्हणाले. मेईतेई आणि कुकी समुदायांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाचा संदर्भ देत हा आरोप केला.

‘लोकांची हत्या झाली आहे, महिलांची छेडछाड झाली आहे आणि लहान मुलांना मारण्यात आले आहे, पण पंतप्रधानांना तिकडं प्रवास करणं महत्त्वाचं वाटत नाही’, असं राहुल गांधी म्हणाले.

मे महिन्यात दोन समुदायांमध्ये हिंसाचार सुरू झाल्यापासून पंतप्रधान मोदींनी अद्याप मणिपूरला भेट दिलेली नाही हे ‘लाजिरवाणे’ असल्याचं ते म्हणाले.

काँग्रेस नेत्यानं पुढे सांगितलं की, मणिपूरमधील हिंसाचार हे केवळ ‘समस्येचे लक्षण’ आहे. ते म्हणाले की देशाच्या कल्पनेवर हल्ला होत आहे आणि देशातील लोकांवर ‘दडपशाही’ केली जात आहे.

‘मणिपूरमध्ये जे घडले तो देशाच्या कल्पनेवरही हल्ला आहे’, असं गांधी म्हणाले. याउलट, त्यांनी सांगितलं की काँग्रेस पक्षाची भारत जोडो यात्रा ज्याचं त्यांनी नेतृत्व केले ती ‘या देशाच्या प्रत्येक धर्म, संस्कृती, भाषा आणि परंपरेचे रक्षण करण्यासाठी’ होती.

राहुल गांधींनी सोमवारी ऐझॉलमध्ये चानमारी जंक्शनपासून राजभवनपर्यंत सुमारे दोन किलोमीटरची पदयात्रा काढली. ते दोन दिवसांच्या मिझोराम दौऱ्यावर आहेत.

40 सदस्यीय मिझोराम विधानसभेसाठी 7 नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे.