… म्हणून ज्योतिरादित्य शिंदे भाजपात गेले, राहुल गांधी यांचे मोठे विधान

काँग्रेसचे युवा नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी मध्य प्रदेश काँग्रेसचा हात सोडून भारतीय जनता पक्षाचे कमळ हाती घेतले. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर 24 तासांच्या आत त्यांना राज्यसभेचे तिकीटही मिळाले. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या काँग्रेस सोडण्याच्या निर्णयावर काँग्रेसचे माजी अध्यक्ष, खासदार राहुल गांधी यांनी मोठे विधान केले आहे. राहुल गांधी यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर निशाणा साधतात, राजकीय भविष्याची भिती वाटत असल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला अशी प्रतिक्रिया दिली आहे.

ज्योतिरादित्य शिंदे यांच्या निर्णयावर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, हे विचारधारेचे युद्ध आहे. मी ज्योतिरादित्य शिंदे यांना चांगलंच ओळखतो. त्यांच्यासोबत माझी जुनी मैत्री असून आम्ही दोघांनी एकत्रच एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेले आहे. त्यांना राजकीय भविष्याची भिती होती, म्हणून आपली विचारधारा खिशात ठेऊन त्यांनी आरएसएस आणि भाजपच्या विचारधारेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी जे केले त्याचा त्यांना लवकरच पश्चाताप होईल. तेथे त्यांचा सन्मानही होणार नाही आणि ते संतुष्टही राहू शकणार नाहीत, असेही राहुल गांधी म्हणाले.

दरम्यान, राहुल गांधी यांनी यावेळी देशाच्या आर्थिक स्थितीवरही भाष्य केले आणि मोदी सरकारवर टीका केली. देशाची आर्थित स्थिती खराब झालेली आहे. आज शेअर मार्केटमध्ये जे काही झाले ते सर्वांसमोर आहे. यावेळी त्यांना मध्य प्रदेशमधील राजकीय परिस्थितीबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी याचे उत्तर देणे टाळले. मी काँग्रेसचा अध्यक्ष नाही. मी फक्त अर्थव्यवस्थेवर बोलण्यासाठी आलो आहे. कोट्यवधी लोकांवर याचा प्रभाव पडत आहे. मोदी सरकार अर्थव्यवस्थेवरील लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप त्यांनी केला. 2008 चे उदाहरण सर्वांसमक्ष आहे, त्यावेळी अर्थव्यवस्था कशी वाचवण्यात आली हे सर्वांना माहिती आहे. लोकांनी पैसे वाचवून खर्च केले होते, परंतु आज गरिबांकडे पैसेच नाहीत. पंतप्रधान मोदी या समस्येवर काय उपाय केले जात आहेत यावर बोलायला हवे असेही राहुल गांधी म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या