
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे रिमोटद्वारे नियंत्रण ठेवतात. गृहमंत्र्यांबद्दल सरमा काही बोलले तर त्यांना शहा दोन मिनिटांत बाहेरचा रस्ता दाखवू शकतात, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी आसाम सरकारवर सडकून टीकास्त्र सोडले. तरुण गोगोईदेखील मुख्यमंत्री होते, पण त्यांनी आसामच्या लोकांना हवे ते केले. तरुण गोगोई हे माझे गुरू आहेत, परंतु मी कधीच त्यांना काय करायला हवे असे सांगितले नाही, असा दावा राहुल गांधी यांनी केला.
सरमा यांनी तुमच्या जमिनी चोरल्या
सरमा तुमच्याशी बोलतात तेव्हा तुमच्या जमिनी चोरतात. तुम्ही सुपारी तोंडात टाकता तेव्हा सुपारीचा व्यापार बळकावतात. सरमा तुमच्या खिशातील पैसे चोरतात तसेच काझीरंगा नॅशनल पार्कवरही त्यांनी ताबा मिळवला, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
दुसरीकडे जमावाला चिथावल्याच्या आरोपाखाली मंगळवारी काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि इतर नेत्यांविरोधात गुवाहाटी पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले. त्यानंतर आज बुधवारी ‘भारत जोडो न्याय यात्रे’च्या सातव्या दिवशी राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्त्यांसह नागरिकांना संबोधित करताना भाजपप्रणीत आसाम सरकारने आपल्यावर कितीही गुन्हे दाखल केले तरी घाबरणार नाही, अशा शब्दांत आव्हान दिले. हिमंता सरमा हे सर्वाधिक भ्रष्ट मुख्यमंत्री असून त्यांच्यावर जमीन आणि सुपारी व्यापार तसेच काझीरंगा राष्ट्रीय उद्यानावर कब्जा केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.
‘जननायक’ बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर झाला. सरकारच्या या निर्णयाचे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी स्वागत केले आहे. ‘एक्स’ अकाऊंटवरून त्यांनी कर्पुरी ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. दरम्यान, खरा न्याय झाला पाहिजे, केवळ दिखाव्याचे राजकारण करू नका, अशा शब्दांत मोदी सरकारला टोलाही लगावला.
प्रत्येक हिंदुस्थानीच्या हृदयात माझे घर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास मित्र गौतम अदानी यांच्याबद्दल प्रश्न विचारल्याने माझ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच मला संसदेतून बाहेर काढून निवासस्थानही काढून घेतले. मी स्वतः निवासस्थानची चावी परत दिली. मला ते नकोच आहे. कारण प्रत्येक हिंदुस्थानी नागरिकाच्या हृदयात माझे घर आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
विरोधातील याचिका निकाली
नऊ वर्षीय बलात्कार पीडितेचा फोटो ‘एक्स’वरून ट्विट केल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्याविरोधात दिल्ली हायकोर्टात खटला सुरू होता, मात्र राहुल गांधी यांनी संबंधित ट्विट डिलीट केल्याची माहिती वकिलांनी हायकोर्टाला दिली. त्यानंतर कोर्टाने राहुल गांधी यांच्याविरोधातील याचिका निकाली काढत रद्द केली.
आसाममध्ये ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक प्रंट ही भाजपाची बी टीम असून इथे काँग्रेसचा मुकाबला बी टीमशीही आहे. हिमंता सरमा जे सांगतात ते ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक प्रंटचे अध्यक्ष बद्रुद्दीन अजमल हे करतात. नाण्याला दोन बाजू असतात. इथे एक बाजू मोदी आणि शहा तसेच तुमचे मुख्यमंत्री आहेत, तर दुसरी बाजू ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक प्रंट आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.





























































