राहुरीत 750 लिटर भेसळयुक्त दूध केले नष्ट

तालुक्यातील कोंढवड-शिलेगाव परिसरातील करपारवाडी येथील दोन दूध संकलन केंद्रांवर नगर येथील अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा मारून दुधात भेसळ करताना रंगेहाथ पकडण्यात आले. दोन दूध संकलन केंद्रांवरील 755 लिटर दूध व पावडर असा एकूण 36 हजार 631 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

राहुरी तालुक्यात सध्या दूध भेसळीचे प्रमाण वाढत चालले असल्याच्या तक्रारी अन्न औषध प्रशासनास प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार पथकाने बुधवारी सकाळी 7.30 वाजता कोंढवड-शिलेगाव परिसरातील दोन दूध संकलन केंद्रांवर अचानक छापा मारून दूध भेसळ करताना रंगेहाथ पकडण्यात आले. पशुवैद्यक दिलीप रघुनाथ म्हसे यांच्या गोरक्षनाथ दूध संकलन केंद्रावर पथकाने छापा मारून दूध भेसळ करताना साहित्यासह रंगेहाथ पकडले. दूध भेसळीसाठी 100 लिटर दूध व पावडरचे 40 लिटरचे द्रावण, पावडर व दूध एकत्रित केलेले भेसळीसाठीचे 300 लिटरचे द्रावण असा एकूण 24 हजार 931 रुपयांचा साठा जप्त केला आहे.

दुसरे दूध संकलन केंद्र रमेश पाटीलबा म्हसे यांच्या म्हसे पाटील दूध संकलन केंद्रावर छापा टाकून 15 किलो पावडर व 300 लिटर भेसळयुक्त दूध असा एकूण 11 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही दूध संकलन केंद्रावरील भेसळयुक्त दुधाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या