संगमनेरातील कत्तलखान्यांवर उपाधीक्षकांच्या पथकाचा छापा; पावणेदोन टन गोमांसासह 10 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संगमनेरचे अवैध कत्तलखाने आणि गोवंश हत्या सुरूच असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले असून, संगमनेर शहर पोलिसांना अंधारात ठेवत पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने या कत्तलखान्यांवर छापेमारी करीत मोठी कारवाई केली आहे. गुरुवारी पहाटे केलेल्या कारवाईत तब्बल 1 हजार 700 किलो गोमांस आणि दोन चारचाकी वाहने असा सुमारे दहा लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. याप्रकरणी सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका अल्पवयीन मुलासह दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

आसिफ इक्बाल कुरेशी (वय 32, हल्ली रा. मदिनानगर, संगमनेर, मूळ रा. मालेगाव, नाशिक), सोनू रफिक कुरेशी, सलीम साटम कुरेशी यांच्यासह दोन वाहनांवरील चालक आणि एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल झाला आहे.

संगमनेर शहरातील मोगलपुरा येथे आयुब तांबोळी याच्या चाळीच्या दोन नंबरच्या खोलीमध्ये सोन्या कुरेशी व त्याचा साथीदार सलीम कुरेशी हे गोवंश जनावरांची कत्तल करत असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांना मिळाली होती. त्यांच्या पथकातील कर्मचाऱयांनी मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी रात्री सव्वा एक वाजता छापा टाकला असता, तिथे तिघेजण गोमांस एका पिकअप आणि मारुती ओमनी कारमध्ये भरताना पथकाला दिसले. त्यातील दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले, तर ओम्नी आणि पिकअपचालक पळून गेले. पकडलेल्या आरोपींकडे पोलिसांनी चौकशी केली असता, आरोपींनी हे गोमांस सोनू कुरेशी व सलीम कुरेशी या दोघांच्या मालकीचे असल्याचे सांगितले. वाहनचालकांविषयीची माहिती मिळू शकली नाही.

या कारवाईत कत्तल केलेल्या जनावरांचे गोमांस, एक पिकअप, एक ओम्नी कार, कुऱहाड, कानस, चाकू असा 9 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, संगमनेर शहर पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आसिफ कुरेशी, सोनू कुरेशी, सलीम कुरेशी यांच्यासह दोन्ही चालक आणि एका बालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

कत्तलखानाचालक नेहमीप्रमाणे फरार

 पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने केलेल्या कारवाईनंतर कत्तलखाना चालकाचे नाव निष्पन्न झाले असून, कत्तलखाना चालक फरार झाले आहेत. फरार झालेल्या दोघा चालकांसह दोन्ही कत्तलखानाचालकांना पकडण्याचे काम शहर पोलिसांना करावे लागणार आहे. बहुतांशी गुह्यांमध्ये फरार आरोपी फरार असून, त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आल्याचे दिसत नाही. त्यामुळे शहर पोलीस या आरोपीसंदर्भात नेमकी काय कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे.

संगमनेरचे पोलीस उपअधीक्षकपद सात महिन्यांपासून रिक्त

संगमनेरचे पोलीस उपअधीक्षकपद जवळपास सात महिन्यांहून अधिक काळ झाले तरी रिक्तच आहे. या पदाचा प्रभारी कार्यभार शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांच्याकडे आहे. सातव संगमनेरमध्ये सातत्याने आपल्या पथकामार्फत अवैध धंद्यांवर कारवाई करताना दिसतात, तर दुसरीकडे शहर पोलीस ठाण्यातील वादग्रस्त पोलीस अधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी हटविले असून, त्यांच्या जागेवर नव्या निरीक्षकांची नियुक्ती झाली असली तरी शहरातील कत्तलखाने सुरूच असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे कत्तलखान्यासंदर्भात काय भूमिका घेतात, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.