
सामना प्रतिनिधी । चाकण
प्लॅस्टिक व थर्माकोलवर राज्यात बंदी घालण्यात आल्यानंतर प्लॅस्टिकची उत्पादने तयार करणाऱ्या कारखान्यांवर तातडीने धाडी टाकून गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी शनिवारी दिले. तसेच चाकण औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांवर त्यांनी स्वतः छापे टाकल्याने प्लॅस्टिक उत्पादन करणाऱ्या कंपन्यांची पाचावर धारण बसली आहे. मालवाहू वाहनातून प्लॅस्टिक घेऊन जाणाऱ्या टेम्पो चालकास रामदास कदम यांनी हटकल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला. रात्री उशिरापर्यंत चाकण एमआयडीसीमध्ये कदम यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महसूल विभाग, चाकण पोलीस यांच्याकडून प्लॅस्टिकच्या कच्च्या व पक्क्या मालाची मोजदाद सुरु होती.
चाकण औद्योगिक वसाहतीतील प्लॅस्टिक पॅकेजिंगसाठी प्लॅस्टिक बबल्स शीट्सचे व अन्य प्लॅस्टिक मालाचे उत्पादन करणारी खराबवाडी ( ता.खेड ) येथील आगरवाल पॅकेजिंग कंपनी व चाकण जवळील कुरुळी (ता. खेड) हद्दीतील मिताली पॅकेजिंग प्रा.लि. या दोन कंपन्यांवर कदम यांनी छापा टाकला. या दोन्ही कंपन्यांमध्ये लाखो रुपये किंमतीचा प्लॅस्टिकचा उत्पादित पक्का व कच्चा माल आढळला. याबाबतची माहिती स्थानिक पोलिसांसह महसूल, एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. शनिवारी दुपारी शिर्डीकडे जात असताना खराबवाडीजवळ एक टेम्पो प्लॅस्टिक घेऊन चाललेला दिसल्याने कदम यांनी चालकाला याबाबत विचारले. टेम्पोतील प्लॅस्टिक आगरवाल पॅकेजिंग कंपनीत नेत असल्याचे चालकाने सांगितले. त्यानंतर कदम यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर थेट कंपनीवर छापा मारला. रात्री उशिरापर्यंत कंपनीत प्रशासनाकडून कारवाई सुरू होती. महसुल प्रशासनासह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. अगरवाल पॅकेजिंग कंपनीतील चारही गोदामातील प्लॅस्टिक मालाची मोजदाद रात्री उशिरापर्यंत सुरु होती.
आगरवाल पॅकेजिंग कंपनीचे व्यवस्थापक मनोज बन्सल यांनी सांगितले कि, कंपनीत प्लॅस्टिकच्या पॅकेजिंगसाठी लागणारे बबल्स शीट्स व अन्य प्लॅस्टिक उत्पादन होत असून या बाबतच्या परवानग्या एमपीसीबीकडून घेण्यात आलेल्या आहेत.


































































