रायगडातील दोन हजार हेक्टर भातशेतीची माती; 5 हजार 878 शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका, ऐन सणासुदीच्या काळात बळीराजावर आर्थिक संकट

रायगड जिल्ह्याला भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते. पण गेल्या काही दिवसांपासून धो धो कोसळलेल्या मुसळधार पावसाचा जबरदस्त फटका शेतकऱ्यांना बसला आहे. ५ हजार ८७८ शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून रायगडातील २ हजार १८५ हेक्टर भातशेतीची अक्षरशः माती झाली. नुकसानीचे पंचनामे कृषी विभागाने सुरू केले असले तरी लवकरात लवकर ही कामे पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्यात सुमारे ९८ हजार हेक्टर क्षेत्रामध्ये भात पिकांची लागवड करण्यात आली होती. सुरुवातीला लहरी हवामानाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. त्यातून सावरलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या मेहनतीने शेती पिकवली. अनेक अडचणींवर मात करत फुलवलेल्या भाताला कणसे धरू लागली होती. यावर्षी शेतीचे उत्पादन चांगले होईल, घेतलेले कर्ज फेडता येईल या आशेवर रायगडातील शेतकरी होते. पण अखेर अतिवृष्टीने घात केला आणि होत्याचे नव्हते झाले. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसाने भातपिके आडवी झाली आहेत.

  • रायगड जिल्ह्यातील ५ हजार ८७८ शेतकऱ्यांच्या २ हजार १८५.१२ हेक्टर भात शेतीचे नुकसान झाले आहे. डोळ्यादेखत पिकाची झालेली माती पाहून बळीराजाच्या डोळ्यांतून अश्रू वाहात आहेत.
  • हातातोंडाशी आलेला घास नियतीने हिरावून घेतल्याने हजारो शेतकरी ऐन सणासुदीच्या काळात आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यांना पुन्हा उभे करण्यासाठी सरकारने लवकरात लवकर मदत करावी, अशी मागणी रायगडवासीयांनी केली आहे.

३० टक्के उत्पादन घटणार

रायगड जिल्ह्यात चार दिवस अतिमुसळधार पाऊस पडला. अवधान जातीच्या भातपिकाला सर्वाधिक फटका बसला असून बाकीची पिके उत्तम आहेत. मात्र भाताच्या उत्पादनात यंदा ३० टक्क्यांनी घट होण्याची शक्यता आहे. अलिबाग तालुक्यात भातावर करपा रोग पडला असून त्यावर फवारणी करण्याच्या सूचना शेतकऱ्यांना दिल्या आहेत.