
सामना ऑनलाईन । मुंबई
‘हिमालय’ पुलाच्या दुर्घटनेपासून धास्तावलेल्या रेल्वे प्रशासनाने एकापाठोपाठ एक पूल बंद करण्याचे धोरण आरंभले आहे. पश्चिम रेल्वेने कोणताही विचार न करता दादर फुलमार्केटचा रॅम्प बंद केल्यानंतर आता मध्य रेल्वेनेही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत प्रवाशांना कोणतीही पूर्वसूचना न देता कुर्ला येथील दोन पादचारी पूल तर सीएसएमटीतील पुलाचा जिना दुरुस्तीकरिता एका फटक्यात बंद करून टाकला. त्यामुळे गोंधळात आणखीनच भर पडल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे.
कुर्ला स्थानकातील शीव दिशेकडील सर्व फलाटांना जोडणारा पादचारी पूल तर दुसरा पालिकेचा कोणत्याही फलाटाला न जोडलेला परंतु कुर्ला पूर्व ते पश्चिम जाण्यासाठी सर्रास वापरला जाणारा पादचारी पूल अचानक बंद करण्याची नोटीस आज लावण्यात आली. आयआयटीच्या अहवालानुसार सर्व पादचारी पूल सुरक्षित आहेत असे रेल्वे एकीकडे म्हणत आहे, तर दुसरीकडे पूल बंद झाल्याने पर्यायी पुलांवर चेंगराचेंगरी होण्याचा धोका असल्याचे प्रवासी संघटनेचे सुभाष गुप्ता यांनी सांगितले.
पालिकेचा पादचारी पूल तर अलीकडेच दुरुस्त करण्यात आला होता. त्यामुळे तो लगेच असुक्षित कसा झाला हे न कळण्यापलीकडे आहे. तसेच कुर्ला पूर्व ते पश्चिम जाण्यासाठी पर्याय म्हणून दिलेला ‘सब वे’ गळका असून त्यात कायम पाणी साचलेले असते असे गुप्ता यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे मध्य रेल्वेने हे पूल नेमके किती दिवस बंद राहणार आहेत यासंबंधी काहीही स्पष्ट न करता प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हे पाऊल उचलल्याचे म्हटले आहे.
























































