रेल्वे पोलिसांचे 400 पोपटांना जीवदान; पंजाब मेलमधून तस्कराच्या मुसक्या आवळल्या

उत्तर प्रदेश, वाराणसी पंजाब मेल एक्सप्रेसमधून सुमारे 4०० जंगली पोपटांना अमेठीहून पश्चिम बंगालमधील बर्धमानकडे  तस्करी केली जात असल्याची घटना घडली आहे. पंजाब पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे.

जीआरपीचे निरीक्षक राजोल नागर यांनी दिलेल्या महितीनुसार, ‘बर्ड लाइफ’ या वन्यजीव संरक्षण संस्थेकडून एका तस्कराविषयी माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. तस्कर मोठ्या संख्येने जंगली पोपट रेल्वेने पश्चिम बंगालमध्ये नेण्याच्या तयारीत होता. जीआरपी आणि आरपीएफच्या पथकांनी रेल्वे स्थानकांवर, मेल आणि एक्सप्रेसमध्ये तपासणी सुरु केली. तपासादरम्यान, पंजाब मेलच्या एका डब्यात एका संशयित व्यक्तीला अडवत त्याची झडती घेण्यात आली. त्यावेळी त्याच्याकडील पिशव्यांमध्ये आणि पिंजऱ्यांमध्ये सुमारे 4०० जंगली पोपट आढळले. ते जप्त करण्यात आले. हे सर्व पक्षी जिवंत होते, परंतु त्यांना अत्यंत कोंदट वातावरणात आणि अमानूषपणे नेले जात होते.

अटक केलेला तस्कर मोहम्मद जाहिद, बर्धमान, पश्चिम बंगाल चा होता. चौकशीदरम्यान, त्याने कबूल केले की तो पोपटाला अमेठीहून बर्धमान येथे घेऊन जात होता, जिथे त्यांची बेकायदेशीरपणे विक्री केली जाणार होती.

जीआरपी निरीक्षकांनी सांगितले की, जप्त केलेले सर्व पोपट जंगली प्रजातीचे आहेत, ज्यांचा व्यापार आणि वाहतूक करणे कायद्याने गुन्हा आहे. या प्रकरणाची माहिती तात्काळ वन विभागाला देण्यात आली. त्यानंतर विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पोपटांच्या प्रजाती, आरोग्य आणि तस्करीच्या पैलूंची सखोल चौकशी सुरू केली. कायद्यांतर्गत तस्कराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जप्त केलेल्या पोपटाला सुरक्षित ठिकाणी पाठवण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.