
रेल्वेच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासह प्रवाशांच्या सुरक्षेकडेही रेल्वे संरक्षण दल (RPF) कर्मचाऱ्यांचे विशेष लक्ष असते. आरपीएफसह कर्तव्यावर असलेल्या इतर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मदतीने रेल्वे प्रवाशांचे प्राणही वाचवतात.
“मिशन जीवन रक्षक”चा एक भाग म्हणून मध्य रेल्वेच्या आरपीएफ जवानांनी जानेवारी ते सप्टेंबर 2022 पर्यंत मध्य रेल्वेवर आतापर्यंत 62 लोकांचे प्राण वाचवले आहेत. काही वेळा स्वतःचा जीवही धोक्यात घातला. या 62 घटनांपैकी एकट्या मुंबई विभागात 24 व्यक्तींचा जीव वाचवण्याच्या घटनांची नोंद झाली आहे. नागपूर विभागात 14 व्यक्तींचा जीव वाचवण्याच्या घटनांची, पुणे विभागात 12 व्यक्तींचा जीव वाचवण्याच्या घटनांची, भुसावळ विभागात 8 व्यक्तींचा जीव वाचवण्याच्या घटनांची आणि सोलापूर विभागात 4 व्यक्तींचा जीव वाचवण्याच्या घटनांची नोंद झाली आहे.
रेल्वे संरक्षण दलाच्या या जवानांना प्रवासी आणि रेल्वे मालमत्तेवरील गुन्हे, अतिरेकी हिंसाचार, ट्रेनच्या वाहतुकीतील अडथळा, हरवलेल्या मुलांची सुटका तसेच ट्रेन आणि रेल्वे परिसरात अंमली पदार्थ जप्त करणे, प्रवाशांचे सामान परत मिळवणे इत्यादी विविध सुरक्षा आव्हानांचा सामना करावा लागतो. ते प्रवाशांच्या सुरक्षेवर बारीक लक्ष ठेवतात.






























































