मुगाला मोड न आल्याने ‘राजधानी’तील मिसळ हुकली!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

एखाद्या नववधूसारखी नटलेली राजधानी एक्प्रेस शनिवारी मोठय़ा दिमाखात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून नवी दिल्लीच्या दिशेने रवाना झाली. मध्य रेल्वेच्या इतिहासातील या पहिल्या राजधानीला रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी हिरवा झेंडा दाखवला. विशेष म्हणजे, या राजधानीत झणझणीत ‘मिसळपाव’ देऊन रेल्वे आणखी एक इतिहास घडवणार होती; पण ऐनवेळी मुगाला मोड न आल्याने राजधानीतील मिसळ हुकली.

मध्य रेल्वेच्या नाशिकमार्गे धावणारी दिल्लीला जाणारी राजधानी एक्प्रेस आज दुपारी 2.50 वा. रवाना झाली. या नव्या मार्गामुळे प्रवासाचे साडेपाच तास वाचणार असून नाशिक, झाशी, ग्वाल्हेर आणि आग्रा ही पर्यटन स्थळे जोडली जाणार आहेत. आयआरसीटी रेल्वेची खानपान सेवा सांभाळते. या कंपनीमार्फत पहिल्यांदाच रेल्वे प्रवाशांना मराठमोळय़ा ‘मिसळपाव’ नाश्ता म्हणून देण्यात येणार होता. या मिसळपावचे फोटो काढण्यासाठी छायाचित्रकारांमध्ये धावपळ सुरू होती. मात्र मिसळीतील मुगाला मोडच आले नाहीत म्हणून आज नाही, तर उद्यापासून मिसळ देऊ, असे एका अधिकाऱयाने सांगितले. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, शिक्षणमंत्री विनोद तावडे, खासदार अरविंद सावंत, राहुल शेवाळे आदी उपस्थित होते.