गर्दीच्या स्थानकांत प्रवाशांचा खिसा थोडा हलका होणार

रेल्वे प्रवाशांना इथून पुढे जादा वर्दळीच्या रेल्वे स्थानकांतून प्रवास करण्यासाठी जादा तिकीट भाडे द्यावे लागू शकते. केंद्र सरकार आता एअरपोर्टच्या धर्तीवर रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांकडून युजर चार्ज लावण्याच्या विचारात आहे. रेल्वे नव्याने विकसित झालेल्या रेल्वे स्थानकांमध्ये तसेच गर्दीच्या रेल्वे स्थानकात प्रवाशांकडून अतिरिक्त चार्ज वसुल करण्यात येणार आहे. हा युजर चार्ज नेमका किती असेल ? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

रेल्के बोर्डाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी स्पष्ट केले आहे, की प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी आणि महसुल मिळविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ही योजना अमलात आल्यावर असे प्रथमच घडेल की रेल्वे प्रवाशांकडून अशा प्रकाराचा स्थानक वापराचा अतिरिक्त चार्ज वसूल केला जाईल.

किती असेल चार्ज?
रेल्वेच्या मते सुरूवातीला मोठय़ा शहरातील गर्दीच्या स्थानकांवर युजर चार्ज लावला जाईल. सध्याच्या घडीला देशाच्या 7 हजार रेल्वे स्थानकांपैकी जवळपास 10 ते 15 टक्के स्थानकांवर हा युजर चार्ज लागू करण्याची योजना आहे. म्हणजे जवळपास 1050 रेल्वे स्थानकांवर हा युजर चार्ज लागू शकतो. परंतू हा चार्ज नेमका किती असेल हे स्पष्ट जरी केले नसले तरी तो जास्त नसेल असे म्हटले जात आहे. रेल्वे ज्या स्थानकांचा पुनर्विकास करणार आहे किंवा झाला आहे, अशाच ठिकाणी युजर चार्ज लागू करेल.

मुंबई आणि दिल्ली रेल्के स्थानकांचा कायापालट
पीपीपी मॉडेल अंतर्गत या स्थानकांना जागतिक दर्जाचे बनविले जाईल. देश-विदेशातील खाजगी कंपन्यांना या लिलावात सहभाग घ्यावा असे आवाहन केले आहे. नवी दिल्ली आणि मुंबई रेल्वे स्थानकांचा संपूर्ण रूपडे बदलण्यात येणार आहे. देशाच्या जीडीपीमध्येही रेल्वे 1.5 ते 2 टक्के योगदान करू शकते आणि हे शक्य असल्याचे नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी म्हटले आहे. यासंदर्भात सादरीकरण करण्यात आले आहे.

हे रेल्वेचे खाजगीकरण नव्हे
हे रेल्वेचे खाजगीकरण नसल्याचे अमिताभ कांत यांनी स्पष्ट केले आहे. खाजगी कंपन्या काही वर्षांसाठी ट्रेन चालवतील. या क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान आणि गुंतकणूक येईल. खासगी रेल्वेने कुणाचे नुकसान होणार नाही तर उलट जागतिक दर्जाच्या सुविधा मिळतील.

आपली प्रतिक्रिया द्या