
उत्तर भारतातील मोठा भाग सध्या पावसामुळे झालेल्या विध्वंसाशी झुंजत आहे. डोंगराळ भागात भूस्खलन आणि मैदानी भागात आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्ते तुटले आहेत, पूल वाहून गेले आहेत आणि शेतात पाणी साचले आहे. प्रशासन आणि नागरिक दोघेही एकत्रितपणे या संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत.
उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि ढगफुटीमुळे मोठे नुकसान झाले आहे. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार आणि हिमाचल प्रदेशात परिस्थिती बिकट झाली आहे. कोटद्वार येथील थलिसैनच्या कलगडी नाल्यात आलेल्या पुरामुळे राष्ट्रीय महामार्ग 121 वरील पूल पूर्णपणे वाहून गेला आहे. यामुळे पाबो ते पैठणीचा संपर्क तुटला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक शेतातील पिकेही उद्ध्वस्त झाली आहेत. फलदवाडी गावात ढगफुटीच्या घटनेत एक घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे, तर अनेक गोशाळांमधून जनावरांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.
जोशीमठ-बद्रीनाथ महामार्गावरील मोठ्या प्रमाणात भूस्खलनामुळे जोगीधराजवळील रस्ता बंद करण्यात आला आहे. हजारो यात्रेकरू अडकले आहेत. रुद्रप्रयाग येथे प्रशासनाने केदारनाथ आणि मध्यमहेश्वर धामची यात्रा 8 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे.
हरिद्वारमध्ये गंगेच्या पाण्याची पातळी 294.30 मीटरवर पोहोचली आहे. ही पाणी पातळी धोक्याच्या चिन्हापेक्षा जास्त आहे. शिमला येथे होणाऱ्या सततच्या पावसामुळे 4 राष्ट्रीय महामार्गांसह एकूण 613 रस्ते बंद झाले आहेत. 448 घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. वीज आणि पाणीपुरवठा खंडित झाला आहे. आतापर्यंत 194 जणांचा मृत्यू झाला आहे.
प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुनेच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे सखल भागातील घरे पाण्याखाली गेली आहेत. लोकांना छतावर राहण्यास भाग पडले आहे. बिहारमध्येही गंगेचे भयंकर रुप पाहायला मिळत आहे.