
गेल्या दोन-तीन दिवसापासून नगर जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमाराला शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने सर्वत्र पाणी पाणी झाले. नगर-कल्याण महामार्गावरची वाहतूक आज सकाळी आठ वाजेपर्यंत ठप्प पडली होती. त्यामुळे या मार्गावरची वाहतूक केडगाव मार्गे वळविण्यात आली होती. अनेक भागांमध्ये घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. तर काही भागत नुकसान झाले आहे. नगर शहरामध्ये दोन ते तीन ठिकाणी छोट्या मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याची माहिती मिळत आहे.
परतीच्या पावसाने नगरला चांगलेच झोडपले आहे. नगर शहरामध्ये काल रात्री दहाच्या सुमाराला जोरदार पाऊस सुरू झाला. सुमारे दीड तास हा पाऊस सुरू झाल्यामुळे सर्वत्र पाणी पाणी झाले होते. नगर शहरातील पटवर्धन चौक, नालेगाव दिल्लीगेट, आदी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहने अडकून पडली होती तर काही ठिकाणी पायी चालण्याची ही वाट राहिलेली नव्हती. नगर-कल्याण महामार्गावर असलेल्या अनेक कॉलनीमध्ये सुद्धा पाणी शिरल्यामुळे व त्या ठिकाणी पक्के रस्ते असल्यामुळे अनेकांचे हाल झाले. तर काहींच्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरल्यामुळे त्यांना बाहेर पडणे सुद्धा मुश्किल झाले होते. पाण्याचा जोर वाढत गेल्यामुळे अनेक ठिकाणची नाले भरभरून वाहत होते. पाण्याचा जोर कमी होत नसल्यामुळे या मार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक तसेच आणि अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. पाण्याचा जोर कमी झाल्यामुळे नंतर थोड्या प्रमाणामध्ये वाहतूक सुरळीत करण्यात आली.




























































