
सामना प्रतिनिधी । परभणी
परभणी शहरासह जिल्ह्यात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाने पहाटे ५ वाजेच्या सुमारास जोरदार हजेरी लावली. या पहिल्याच पावसाने परभणी शहरातील लक्षवेधी असलेल्या रस्ताकामाचे तीन तेरा वाजले आहेत. या पावसामुळे जिल्ह्याच्या तापमानात कमालीची घट झाली आहे. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे अनेक भागातील झाडे उन्मळून पडल्याने बहुतांश भागातील वीज गुल झाली होती.
जिल्हाभरात सर्वदूर पाऊस झाला असून परभणी तालुक्यात सरासरी १९.५० मि.मी. पाऊस झाला आहे. परभणी शहरामध्ये २७ मि.मी. पाऊस झाला आहे. तर ग्रामीण भागात २४ मि.मी.पाऊस झाला. पालम तालुक्यात २१ मि.मी., पूर्णा ८.६०, गंगाखेड ६,५०, सोनपेठ २३, सेलू १४, पाथरी ५, जिंतूर १७.६७ आणि मानवत तालुक्यामध्ये ४.६७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सोनपेठ मंडळात सर्वाधिक ३६ मि.मी. पाऊस झाला असून त्या खालोखाल पूर्णा तालुक्यातील चुडावा मंडळात ३४ मि.मी. पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात मान्सून दाखल झाला नसला तरी मान्सूनपूर्व पाऊस जोरदार बरसत असल्याने शेतकरी सुखावला आहे. मंगळवारी जिल्हाभरात ११.७७ मि.मी. पाऊस झाला. यावर्षी मान्सूनचे आगमन वेळेत होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यापूर्वीच पाऊस सुरू झाला आहे. रविवारी मध्यरात्री व त्यानंतर मंगळवारी पहाटे जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास पावसाला प्रारंभ झाला. परभणी शहरात दोन तास हा पाऊस बसरला. त्यामुळे शहरात सखल भागात पाणी साचले होते.

































































