राजापूर, चांदेराईतील पाणी ओसरले मात्र पुराचा धोका कायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्हा जलमय झाला आहे. राजापूर तालुक्यातील जवाहर चौक आणि चांदेराई परिसरात पुरसदृ स्थिती निर्माण झाली होती. दुपारनंतर पाणी ओसरल्यावर जनजीवन पुर्वपदावर आले. मिऱ्या येथील धुपप्रतिबंधक बंधारा समुद्राच्या अजस्त्र लाटांनी पुन्हा एकदा गिळंकृत केला आहे. बंधाऱ्याला भगदाड पडल्यामुळे परिसरातील अनेक कुटूंबीय धोक्याच्या छायेत आहेत.

अर्जुना नदीचे पाणी काल रात्रीपासून राजापूर शहरात शिरण्यास सुरुवात झाली. शुक्रवारी सकाळी जवाहर चौक जलमय झाला होता मात्र आज दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पाणी ओसरले. रत्नागिरी तालुक्यातील मिऱ्या येथील धुपप्रतिबंधक बंधारा अधिक धोकादायक बनला आहे. समुद्राच्या लाटांनी बंधाऱ्याचे दगडच गिळून टाकले आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी समुद्राच्या लाटा भर लोकवस्तीत शिरण्याची भीती निर्माण झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ८६.५६ मिमी पाऊस पडला. त्यामध्ये मंडणगड ६८ मिमी, दापोली ३१ मिमी, खेड ८५ मिमी, गुहागर ३० मिमी, चिपळूण ८५ मिमी, संगमेश्वर १४१ मिमी, रत्नागिरी ७७ मिमी, लांजा १८७ मिमी, राजापूर तालुक्यात ७५ मिमी इतका पाऊस पडला. दापोली तालुक्यातील उरकी येथील अनंत कातकर यांच्या घराचे २,२५० रुपयांचे नुकसान झाले आहे. खेड तालुक्यातील खेड येथे विश्वास पाटणे यांच्या किराणा दुकानाचे २० हजार रुपयांचे, गुहागर तालुक्यातील कोथळूक येथे दिलीप मोहिते यांच्या घराचे ३ हजार रुपयांचे, संगमेश्वर तालुक्यातील संगमेश्वर येथील प्रथमे अपार्टमेंटवरील पत्र्यांचे नुकसान झाले आहे.