
पावसाळ्यात विविध प्रकारच्या औषधी आणि पौष्टिक रानभाज्या उगवतात. निसर्गाने मुक्त हस्ते दिलेला हा अनमोल ठेव्याचा आस्वाद सर्वांना घेता यावा याकरिता रानभाज्यांच्या प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. देवगडमधील मिलिंद सदानंद पवार पूर्व प्राथमिक शाळेमध्ये रानभाज्यांचा उपक्रम आगळ्यावेगळ्या पद्धतीने राबवण्यात आला.
टाकळा, कुर्डू, अळू, ओवा, कर्टोली, शेवगा, भारंगी, शेवळ, फोडशी, कुटणी, रानअळू अशा विविध प्रकारच्या रानभाज्यांची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी आणि त्यांना बाजारविक्रीचे ज्ञान अनुभवता यावे, याकरिता या उपक्रमाचे आयोजनक करण्यात आले होते. यामध्ये इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. आमच्या ‘भाजी मंडईला भेट द्या’, ‘आमच्या भाज्या विकत घ्या’, अशा विद्यार्थ्यांच्या हाकेला शिक्षक, पालक तसेच इतर नागरिकांनीही चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला.
रानभाज्यांच्या उपक्रमामध्ये पावसाळ्यात उगवणाऱ्या विविध प्रकारच्या रानभाज्या विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी आणल्या होत्या. या उपक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक संजीव राऊत, पर्यवेक्षक पाटील पूर्व प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालय विभागाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. या अभिनव कार्यक्रमासाठी सर्व स्तरांतून विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.



























































