
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा वाढणार असून त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा भडकणार आहेत. याचे चटके भाजपला 2019 च्या निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांतील एक्झिट पोलने पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची चिंता वाढविली असतानाच पुन्हा एकदा झटका बसण्याची शक्यता आहे.
सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले होते. पेट्रोल 90 रुपयांवर तर डिझेल 80 रुपयांवर गेले होते. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये 2.50 रुपये कपात केली होती. राज्यांनाही तितकीच कपात करण्याचे आवाहन केले होते. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमती घसरल्यामुळे गेल्या महिनाभरात पेट्रोल प्रतिलिटर 80 रुपयांपेक्षा कमी झाले आहे. पण पुन्हा इंधन दरवाढीचा भडका होऊ शकतो. यामुळे देशातील जनतेचा रोष वाढेल. 2019 पूर्वी इंधन दरवाढ झाल्यास याचे चटके भाजपला लोकसभा निवडणुकीत बसू शकतात. जनतेच्या नाराजीचा फटका बसेल असा अंदाज आहे.
सरकार अबकारी कर वाढविणार!
पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक निकालानंतर मोदी सरकारकडून अबकारी करात दोन रुपयांपर्यंत वाढ केली जाऊ शकते. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमतीत 2 ते 2.50 रुपयांपर्यंत वाढ होईल असा अंदाज आहे. सध्या पेट्रोलवर प्रतिलिटर 18.48 रुपये तर डिझेलवर 14.33 रुपये अबकारी कर केंद्र सरकार वसूल करते. त्यानंतर राज्यांकडून व्हॅट घेतला जातो.
गेल्या काही दिवसांत कच्च्या तेलाच्या घसरलेल्या किमती लक्षात घेऊन तेल उत्पादक 10 देशांनी तेलाचे उत्पादन 1.2 दशलक्ष बॅरल प्रतिदिन घटविण्याचा निर्णय घेतला आहे. जगभरातील तेल उत्पादनाचा अर्धा भाग ‘ओषेक’ आणि अन्य देशांकडून होता. ‘ओपेक’ देशांची बैठक नुकतीच झाली. गेल्या दोन महिन्यांत तेलाच्या किमतीत 30 टक्के घट झाल्याबद्दल चिंता व्यक्त करून उत्पादन घटविण्याचा निर्णय घेतला. कच्च्या तेलाचे उत्पादन घटले की भाववाढ अटळ आहे. हिंदुस्थान 80 टक्के तेल आयात करतो. त्यामुळे पेट्रोल-डिझेलची आगामी काळात दरवाढ निश्चित आहे.
























































