
कै. वसंतराव नाईक यांनी त्यांच्या कार्यकाळात कृषी विधायक धोरण, महिला शेतकऱयांचे सक्षमीकरण व विविध योजना प्रभावीपणे राबविल्या. कोरडवाहू शेतीच्या विकासासाठी त्यांनी बहुमोल योगदान दिले. कै. नाईक यांनी पाहिलेले हरितक्रांतीचे स्वप्न साकार झाले आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले यांनी केले.
कृषी विभाग, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती कृषिदिन म्हणून साजरी करण्यात आली. याप्रसंगी जिल्ह्यातील शेतकऱयांना ‘उत्कृष्ट शेतकरी’ पुरस्कार जि. प. अध्यक्षा राजश्री घुले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.
याप्रसंगी सभापती काशिनाथ दाते, मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप, कृषी उपसंचालक विलास नलगे, सुनीलकुमार राठी, अशोक डमाळे, प्रमोद साळवे, प्रवीण गोरे, कौस्तुभ कराळे, प्रकाश महाजन आदी उपस्थित होते.
राजश्री घुले म्हणाल्या, भावी काळात नुसते अन्नधान्य उत्पादन घेण्यावर भर न देता दर्जेदार व गुणात्मकतेवर लक्ष केंद्रित करावे लागेल. शेतीत नवनवीन प्रयोग करण्याची आवश्यकता आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी विविध विद्यापीठे, संस्था यांच्याकडून दिवसेंदिवस नवनवीन शोधमोहीम सुरू करण्यासाठी प्रोत्साहित केले असून, त्याला चांगले यश येत आहे. जमिनीतील कर्बाचे प्रमाण कमी होत असून, त्यासाठी सेंद्रिय खते व शेणखताचा वापर वाढवणे गरजेचे आहे. जैविक खतांचा वापर, बीजप्रक्रिया व पेरणीवेळी खते देण्याकडे शेतकऱयांचे दुर्लक्ष होते. त्यासाठी विस्तार यंत्रणेने अधिक प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.
कृषी विभाग ‘आत्मा’अंतर्गत नाथा देशमुख, सतीश पालवे, नवनाथ सायकर, अविनाश लहाणे, संजय वागस्कर, रामेश्वर जगताप, ताराचंद गागरे, बाळासाहेब खरात, शांताराम बारामते, मीनाक्षी निर्मल यांना, कृषी विभागाच्या वतीने भानुदास थोरात, पांडुरंग कर्डिले, बबन पागिरे, हरिभाऊ म्हस्के, देविदास खाटिक, कृष्णा परदेशी, धनराज पवार, आबासाहेब वावरे, महेश म्हस्के या शेतकऱयांना ‘उत्कृष्ट शेतकरी’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. सूत्रसंचालन कांतिलाल ढवळे यांनी केले, तर आभार सुनीलकुमार राठी यांनी मानले.
























































