
राजस्थानच्या सिकर जिल्ह्यातील खाप पंचायतने शुद्धीकरण करण्याच्या नावाखाली काकू-पुतण्याचे कपडे उतरवल्याचे समोर आले. एवढेच नाही तर दोघांना नग्न करून 400 लोकांसमोर अंघोळ घातल्याची अमानवीय घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. घटना घडल्यानंतर 11 दिवसांनी याचा पोलिसांना सुगावा लागला आहे. या प्रकरणी अखिल राजस्थान सांसी समाज सुधारणा आणि विकास संस्थेचे अध्यक्ष सवाई सिंह मालावत यांनी तक्रार दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी 10 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
काही दिवसांपूर्वी सिकर जिल्ह्यात नेछवा ग्राम पंचायत भागात येणाऱ्या सोला गावात काकू-पुतण्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये समोर खाप पंचायतीचे लोक दिसत असून शुद्धीकरण करण्याच्या नावाखाली काकू-पुतण्याचे सर्व कपडे उतरवण्यात येतात आणि जवळपास 400 लोकांसमोर अंघोळ घातली जाते. तसेच दोघांना दंड देखील ठोठावला जातो. खाप पंचायतीने तरुणाकडून (पुतण्या) 31 हजार आणि तरुणीकडून (काकू) 22 हजार रुपये वसूल केले.
दरम्यान, 21 ऑगस्टला ही घटना घडली असून सिकर, चुरू, झुंझुनू आणि बिकानेर येथील खाप पंच शिक्षा सुनावण्यासाठी जमा झाले होते. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर सिकरचे एएसपी देवेंद्र शर्मा यांनी पीडितांना कुटुंबियांच्या परवानगीने अंघोळ घातली गेली. तसेच या प्रकरणी सासू-सासऱ्याशी चौकशी सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले. ‘लाईव्ह हिंदुस्थान’ने याबाबत वृत्त दिले आहे.
























































