प्लॅस्टिकचा कचरा द्या; मोफत चहा प्या! पर्यावरण संवर्धनासाठी उदयपूरच्या तरुणाचे अनोखे पाऊल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘प्लॅस्टिकचा कचरा द्या आणि मोफत चहा प्या’ ही भन्नाट ऑफर ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल ना, परंतु उदयपूर येथील एका चहा टपरीवरील देण्यात आलेली ही ऑफर सध्या सगळय़ांच्या कौतुकाचा विषय ठरली आहे.

प्लॅस्टिकच्या कचऱ्याची समस्या दूर व्हावी आणि आपला परिसर स्वच्छ राहावा यासाठी केलवाडा येथे चहाची टपरी चालवणाऱ्या भग्गासिंग या युवकाने ही अनोखी ऑफर जाहीर केली आहे. ‘प्लॅस्टिकचा कचरा द्या, मोफत चहा प्या’ असा फलकच त्याने आपल्या टपरीबाहेर लावला आहे. हा फलक सर्वांचे लक्ष वेधून घेतोय. सोशल मीडियावरही त्याच्या टपरीचे पह्टो व्हायरल होत आहेत.+

प्लॅस्टिकच्या कचऱ्याची समस्या दूर करण्यासाठी त्याने घेतलेल्या पुढाकाराचे नेटिझन्स भरभरून कौतुक करतायत. सर्वसामान्यांसह सेलिब्रेटीदेखील आवर्जून त्याच्या टपरीला भेट देत आहेत.अलीकडेच क्रिकेटपटू रवी बिष्णोई यानेदेखील भग्गासिंगच्या टपरीला भेट दिली.  स्थानिक नागरिक आपल्या परिसरातील कचरा गोळा करून त्याच्या टपरीवर जमा करताना दिसतायत. त्यामुळे परिसर स्वच्छ होण्यास मदत होतेय. ‘स्वच्छ भारत’च्या सोशल मीडियावरदेखील या उपक्रमाची दखल घेतली आहे.