पोलिसांच्या डोळ्यात मिर्ची टाकून फिल्मी स्टाईलने 16 कैदी फरार

बॉलीवूडच्या जून्या चित्रपटांमध्ये गुंडांपासून बचाव करणाऱ्या व्यक्ती किंवा पोलिसांच्या तावडीतून पळ काढण्याच्या तयारीत असलेले कैदी डोळ्यात मिर्ची टाकून पळाल्याचे बरेच प्रसंग आढळतील. तशीच एक घटना समोर आली आहे.

राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यातील फलोदी कारागृहातून सोमवारी 16 कैदी फरार झाल्याची घटना घडली आहे. कारागृह सुरक्षारक्षकांच्या डोळ्यात कैद्यांनी मिरची टाकून फरार झाले. सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार, फरार झालेल्या कैद्यांवर हत्या, अपहरण यांसारखे आरोप आहेत. 16 कैदी जेल मधून फरार झाल्याची माहिती मिळताच, जोधपूर जिल्हा प्रशासनाची खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच जिल्हा न्यायाधीश, पोलीस उपअधिक्षक यांच्यासोबत काही वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. जोधपूर पोलिसांनी फरारी कैद्यांना पकडण्यासाठी ठिक-ठिकाणी नाकाबंदी केली आहे, तसेच जिल्ह्याला लागून असलेल्या सीमांवर पोलिसांच्या आधारे तपास केला जात आहे.

जोधपूर जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी यशपाल आहूजा यांनी मीडियाला ह्या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, कारागृह अधिकाऱ्यांच्या हलगरजिपणामुळे कैदी फरार झाले. आहुजा यांनी सांगितले की, कारागृहाला दुहेरी सुरक्षा आहे, तरी सुद्धा कैदी फरार झाले आहेत. तसेच कैद्यांनी कारागृहातून पळून जाण्याची योजना आधीच बनवली होती. मिळालेल्या माहिती नुसार जेल प्रशासनाने सांगितले की, कैद्यांनी कारागृहातून पळ काढत असताना महिला सुरक्षा रक्षकाच्या डोळ्यात मिर्ची टाकली, तसेच कारागृहात तैनात असणाऱ्यांना सुद्धा त्यांनी मारहाण केली.

आपली प्रतिक्रिया द्या