वाळवंटातील हिरवं जंगल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनंत सोनवणे,[email protected]

राजस्थानातील सारिस्का व्याघ्र प्रकल्प. शुष्क, वाळवंटी प्रदेशाला वाघांसोबत इतर प्राण्यांच्या नांदतेपणामुळे हिरवाईचा आशीर्वाद लाभलाय…
वाळवंटी राजस्थानात अरवली पर्वतरांगांच्या उंचसखल दऱयाखोऱयांमध्ये सारिस्काचं हिरवं जंगल पसरलंय. अलवरच्या संस्थानिकांचं हे राखीव शिकारवन असलं तरी राजांशिवाय इतरांना इथं शिकार करायला मनाई होती. त्यामुळे संस्थानिकांच्या काळात हे जंगल सुरक्षित राहिलं. मात्र स्वातंत्र्योत्तर काळात स्थानिक लोकांनी बेसुमार जंगलतोड सुरू केली, चोरटी शिकार वाढली. त्यामुळे 1955 साली सारिस्काचं जंगल संरक्षित वन्य जीव अभयारण्य घोषित झालं. त्यामुळे या देखण्या जंगलाला आणि त्यातल्या वन्य जीवांना पुन्हा संरक्षण मिळालं.

सारिस्काचं जंगल पानगळीचं, काटेरी शुष्क वनांचं आहे. इथल्या टेकडय़ांवर खैर, ढोक व सालई वृक्षांची चादर पसरली आहे. नदीकिनारी कदंब, उंबर, जांभूळ आहे. त्याशिवाय बोर, तेंदू, अर्जुन, बेहडा, खिरनी ही झाडंही आहेत. बांबूची बनं आहेत तशा अडुळसा, अमरकंद, नागवेलीसारख्या औषधी वनस्पती आहेत. काही सपाट प्रदेशांवर विस्तीर्ण गवताळ कुरणं आहेत. तिथं तृणभक्षी प्राण्यांचं सहज दर्शन होतं तसंच त्यांना भक्ष्य बनवणारे प्राणीही दिसू शकतात.

वाघ हे सारिस्काचं प्रमुख आकर्षण. 1978 साली इथं व्याघ्र प्रकल्प जाहीर झाला तरीही वाघांची चोरटी शिकार सुरूच राहिली. 1986 साली सारिस्कात 35 वाघ होते. 2003 साली त्यांची संख्या 16 वर घसरली. मग संपूर्ण वाघ सोडाच, पण त्यांच्या पंजांचे ठसे, नखांचे ओरखडे, विष्ठा अशा खुणाही दिसणं पूर्णतः बंद झालं. सारिस्कातले वाघ काही काळाकरिता इतर जंगलांत स्थलांतरित झालेत अशी भूमिका राजस्थान वन विभागानं मांडली. प्रसारमाध्यमं आणि स्वयंसेवी संस्थांनी मोठा आक्रोश केला. त्यामुळे सरकारने तातडीची व्याघ्रगणना घोषित केली. दोन महिन्यांच्या सखोल तपासानंतर वन विभागाला जाहीर करावं लागलं – सारिस्कात वाघ उरले नाहीत! चोरटी शिकार आणि वन विभागाची अकार्यक्षमता हीच यामागची प्रमुख कारणं होती. नंतर तीन वाघ सारिस्काच्या जंगलात सोडले गेले. त्यांच्या पुनर्वसनासाठी विशेष प्रयत्न केले गेले. त्या प्रयत्नांना यश आलं आणि सारिस्काच्या जंगलात पुन्हा वाघाच्या डरकाळ्या घुमू लागल्या. सध्या इथं वाघांची संख्या 13च्या आसपास पोहोचलीय. अर्थात इथल्या डोंगराळ प्रदेशामुळे वाघाचं दर्शन होणं सोपं नाही.

वाघाव्यतिरिक्त सारिस्कात बिबळ्या, रानमांजर, तरस, लांडगा, चितळ, सांबर, नीलगाय, चिंकारा, चौशिंगा, रानडुक्कर, ससा, लंगूर इत्यादी प्राणी पाहायला मिळतात. बिबळ्याच्या सहा प्रजातींपैकी सर्वात मोठय़ा कनवारी प्रजातीचे बिबळे सारिस्कात दिसतात. कनवारी बिबळा मोठय़ा म्हशींची शिकार करण्याएवढा ताकदवान असतो असं म्हटलं जातं. सारिस्कात नाग, धामण, अजगर, विरुळा, मण्यार, घोरपड, रानसरडे, रानपाली इत्यादी सरपटणारे प्राणीही मोठय़ा प्रमाणावर आहेत.

इथल्या सिलीशेठ तळ्यावर पक्ष्यांची जत्रा भरते. त्यात पाणकोंबडय़ा, पाणकावळे, कमल पक्षी, खंडय़ा, वारकरी, करकोचे, चमच्या, नदी सुरय वगैरे स्थानिक पक्षी असतातच, शिवाय हिवाळ्यात हजारो किलोमीटरचा प्रवास करून सैबेरिया व युरोपातून स्थलांतरित पक्षीही येतात. त्यात सररुची बदकं, चिकल्या बदकं, भिवई बदकं, चक्रवाक्र, कृष्णकादंब, खरकौंच इत्यादी पक्ष्यांचा समावेश होतो. या पाणपक्ष्यांव्यतिरिक्त जंगलात विविध प्रकारचे गरूड, ससाणे, घारी, गिधाडे, कोतवाल, कस्तुर, धनेश, मैना, टकाचोर, सुतार, खाटीक, लावा, पारवा, तित्तर, घुबड, वटवटय़ा, शिंपी, मोर, रानकोंबडा हे पक्षीही पाहायला मिळतात. वन्य जीव पर्यटकांनी जंगलात जावं की जाऊ नये यावर प्रदीर्घ काळ वादविवाद सुरू आहेत. मात्र जंगलात वाघासारखे वन्य जीव खरंच आहेत की नाहीत हे पर्यटकांच्या माध्यमातून पारदर्शकपणे सिद्ध होतं. सारिस्कातून वाघ नाहीसे झाल्याचं केवळ पर्यटनामुळेच उघड झालं अन्यथा ते कधीच जगासमोर आलं नसतं. त्यामुळे आपल्यासारख्या वन्य जीवप्रेमींनी आवडीबरोबरच कर्तव्य म्हणूनही सारिस्कासारख्या जंगलाला भेट द्यायलाच हवी.