राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसारखी स्थिती; मुंबईत रात्रीची संचारबंदी – राजेश टोपे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजेश चुरी

राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ज्या पद्धतीने वाढत आहे ते पाहिले तर दुसरी लाटसदृश परिस्थिती नक्कीच आहे, अशा शब्दांत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज चिंता व्यक्त केली. मुंबईत इतक्यात लॉकडाऊन लागणार नाही; मात्र रात्रीची संचारबंदी होऊ शकते असे सूतोवाच त्यांनी केले. हे सर्व टाळण्यासाठी मौजमजा, पाटर्य़ा अशा अनावश्यक गोष्टी टाळव्यात असे आवाहन त्यांनी केले. मागील महिन्याच्या तुलनेत रुग्णसंख्या तीन पटीने वाढत असली तरी मृत्युदर निम्म्याने कमी झाला आहे असा दिलासा त्यांनी यावेळी दिला.

मुंबईसह राज्यात वाढत असलेल्या कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रुग्णांची वाढती संख्या, कमी झालेला मृत्युदर, लॉकडाऊन, मास्क न वापरणाऱयांकडून वसूल केलेला दंड, आतापर्यंतचे लसीकरण या विषयांवर संवाद साधला. राजेश टोपे यांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे…

रुग्णवाढ पण मृत्युदर निम्म्याने कमी

मुंबईत 10 जानेवारी ते 10 फेब्रुवारीअखेर दररोज 300 केसेस सापडत होत्या. सध्या नवीन रुग्ण वाढत आहेत. नवीन रुग्णांची संख्या मागील महिन्याच्या तुलनेत तीन पट असली तरी मृत्यदर निम्म्यापेक्षा कमी झाला आहे.

मुंबईत चाचण्यांचे प्रमाण अडीच पटींनी वाढवले आहे. नवीन रुग्णांमध्ये 84 टक्के रुग्ण लक्षणविरहित आढळत आहेत. रुग्णालयात पुरेशा संख्येने बेड उपलब्ध आहेत.

लॉकडाऊनऐवजी जनजागृतीची गरज

मुंबईत लसीकरणाची संख्या वाढवण्यात येत आहे. त्यामुळे लॉकडाऊनऐवजी लोकांमध्ये कोरोना प्रतिबंधक उपाय म्हणजे मास्क वापरणे, अनावश्यक गर्दी टाळणे, वारंवार हात धुणे यासाठी जनजागृती गरज आहे.

लोकल सेवा बंद नाही

लोकल सेवा ही मुंबईची जीवनवाहिनी आहे; मात्र ती पूर्णपणे बंद करून चालणार नाही. पुठलीही बाब पूर्ण बंद करण्यापेक्षा त्यावरील निर्बंध अधिक कडक केल्यास लॉकडाऊन करायची वेळ येणार नाही.

झोपडपट्टीत फक्त 5 टक्के रुग्ण

मुंबईत 3 लाख 40 हजार बाधित रुग्ण आहेत. त्यापैकी 3 लाख 15 हजार रुग्ण बरे झालेत. 11 हजार 519 रुग्णांचा मृत्यू झाला. 12 हजार 487 सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील 370 गंभीर आहेत. सध्या मुंबईत जे नवीन रुग्ण आढळून येत आहेत त्यातील 95 टक्के रुग्ण हे झोपडपट्टीच्या बाहेरचे आहेत. म्हणजे सध्या तरी मुंबईच्या झोपडपट्टीत 5 टक्केच रुग्ण आढळत आहेत.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून बहुतांश जिह्यांमध्ये कोरोनाचे नवीन रुग्ण मोठय़ा संख्येने आढळून येत आहेत ही वस्तुस्थिती आहे. काही जिह्यांचा पॉझिटिव्हिटी दर हा वाढला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन पूर्णपणे खबरदारी घेत आहे. राज्यात पूर्णपणे दुसरी लाट आली असे म्हणता येणार नाही. मात्र तशी परिस्थिती जाणवत आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून दररोज 500 ते 1 हजार रुग्णांची वाढ होत आहे.

41 कोटींचा दंड

मास्क न वापरणाऱयांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मास्क न वापरल्यामुळे मुंबईत आतापर्यंत 20 लाख 5 हजार लोकांकडून सुमारे 41 कोटी रुपये दंड वसूल केला आहे. मास्क वापरण्याचे वारंवार आवाहन करूनही लोकांकडून अशी बेपर्वाई दाखवली जात आहे.

राज्यातील स्थिती

संभाजीनगर – शनिवार, रविवार कडकडीत लॉकडाऊन, इतर दिवशी रात्री 11 ते सकाळी 7 बंद.
नागपूर – 15 ते 21 मार्चपर्यंत लॉकडाऊन, अत्यावश्यक सेवा आणि उद्योग सुरू राहणार.
पुणे – रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी, 31 मार्चपर्यंत शाळा-महाविद्यालये बंद, हॉटेल-बार रात्री 10 नंतर बंद. संध्याकाळी उद्यानांनाही टाळे लागणार.
नाशिक – संध्याकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत रात्रीची संचारबंदी. 15 मार्चनंतर लग्नसोहळय़ांवर बंदी. शनिवारी-रविवारी धार्मिक स्थळे बंद.

राज्य

रुग्ण – 15,602
मृत्यू – 88

मुंबई

रुग्ण – 1,709
मृत्यू – 5