मराठी माणसाच्या विकासासाठी मुंबईत ठाकरेच हवेत, शिवसेना-मनसे युतीला राजू शेट्टींचा जाहीर पाठिंबा

मुंबई महापालिका निवडणुकीचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे. मुंबई महापिलेकवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी साम, दाम दंड, भेद या तत्वावर भाजपसह मिंधे गट कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र, मराठी माणसाच्या भल्यासाठी मुंबईत ठाकरेच विजयी व्हावेत, अशी आमची इच्छा आहे. ठाकरे बंधूंच्या या युतीला आमचा पाठिंबा आहे, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी म्हणाले आहेत.

शेट्टी यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यावेळी राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही फटकारले आहे.

शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी धाराशीवमध्ये आंदोलन करण्यात आले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राजू शेट्ठी यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधुंना पाठिंबा दर्शवला आहे. ते म्हणाले की, आमचे वैचारिक मतभेद असले तरीही मुंबईत मराठी माणसाच्या भल्यासाठी ठाकरे बंधूच विजयी व्हावेत. आमचा त्यांना पाठिंबा आहे, असं राजू शेट्टी म्हणाले. तसेच यावेळी बोलताना त्यांना देवेंद्र फडणवीसांवरही टीका केली आहे.

मराठी माणसावर आणि मुंबईवर आमचं प्रेम आहे आणि त्यांच्या विकासासाठी आपण प्रयत्न करत असल्याचा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा राजू शेट्टी यांनी खोडून काढला. ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या हक्काचे प्रकल्प गुजरातला किती पाठवले त्याची माहिती घ्या, म्हणजे त्यावरून मराठीवर असणारे मुख्यमंत्र्यांचे प्रेम दिसून येईल, असा टोला राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.