ठरलंय! तटबंदी भक्कम… महाविकास आघाडी चौकार मारणार! उद्धव ठाकरे, शरद पवार आणि खरगे यांनी केले मार्गदर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज सायंकाळी ट्रायडंट हॉटेलमध्ये महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी या बैठकीला मार्गदर्शन केले. महाविकास आघाडीची तटबंदी भक्कम असून आमचं ठरलंय, आम्ही चौकार मारणारच, असा निर्धारच यावेळी व्यक्त करण्यात आला.

राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी 10 जून रोजी मतदान होणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार या निवडणुकीत भाजपचे दोन, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येकी एक उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतो. शिवसेनेने दुसरा आणि भाजपने आपला तिसरा उमेदवार उभा केल्याने निवडणुकीत चुरस तर निर्माण झाली आहेच, पण राजकीय मोर्चेबांधणीलाही वेग आला आहे.

महाविकास आघाडीतील सर्व आमदारांची बैठक आज सायंकाळी घेण्यात आली. या बैठकीला 12 अपक्ष आमदारही उपस्थित होते. त्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्याने शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांचे पारडे जड झाले आहे.

एकीची वज्रमूठ

महाविकास आघाडीने आज पुन्हा एकदा एकीची वज्रमूठ दाखवली आणि राज्यसभा जिंकण्याचा निर्धारच केला. आघाडीकडे पुरेसे संख्याबळ असल्याने आपले चारही उमेदवार निवडून येणार, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. सत्तापिपासू लोकांना आपल्याला सत्तेपासून दूर ठेवायचे आहे. सर्व उमेदवार निवडून आणायचे आहेत. त्यासाठी आपले ऐक्य दाखवा, असे मुख्यमंत्री म्हणाले.

महाविकास आघाडीची बैठक ट्रायडमध्ये झाली. यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री सुभाष देसाई, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले व्यासपीठावर उपस्थित होते.

भाजपचे आमदार ताजमध्ये

राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात असल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे. स्वपक्षातील आमदारांना सांभाळण्याबरोबर अन्य आमदारांची जुळवाजुळव करण्याची कसरत सहाव्या उमेदवाराच्या विजयासाठी भाजपा नेते करताना दिसत आहेत. भाजपाने त्यांच्या आमदारांना हॉटेल ताज हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवले आहे.

अपक्षांच्या पाठिंब्यामुळे आघाडीचे पारडे जड

राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे पारडे दिवसेंदिवस जड होत आहे. ट्रायडंट हॉटेलमध्ये बोलावण्यात आलेल्या बैठकीला  आघाडीतील तिन्ही पक्षांचे आमदारच नव्हे, तर अपक्ष आणि छोटय़ा पक्षांच्या 12 आमदारांनीही उपस्थित राहत राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीला पाठिंबा दर्शविला. मंत्री शंकरराव गडाख (क्रांतिकारी शेतकरी पक्ष), राजेंद्र यड्रावकर यांच्यासह गीता जैन, मंजुळा गावित, आशीष जयस्वाल, चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर), किशोर जोरगेवार, संजय शिंदे, नरेंद्र बोंडेकर, विनोद अग्रवाल, देवेंद्र भुयार (स्वाभिमानीचे माजी नेते), शामसुंदर शिंगे (शेकाप), राजकुमार पटेल (प्रहार जनशक्ती पक्ष), विनोद निकोले (माकप) हे आमदार या बैठकीत उपस्थित होते.

चौथा उमेदवार चांगल्या मतांनी विजयी होईल

मविआकडे बहुमत आहे. त्यामुळे आघाडीचा चौथा उमेदवार चांगल्या मतांनी विजयी होईल. समाजवादी पक्ष हा भाजपविरोधी उत्तर प्रदेशमध्ये राहिलेला आहे आणि त्यांचा मूलाधार तोच आहे. त्यामुळे ते महाविकास आघाडीला पाठिंबा देतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी क्यक्त केला.

आघाडीच्या नेत्यांनी संपर्क साधावा

महाराष्ट्रात एमआयएमचे दोन आमदार आहेत. राज्यसभा निवडणुकीत आपले उमेदवार जिंकून आणण्यासाठी मविआला आमची गरज आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आमच्याशी संपर्क केल्यास त्यांना मतदान करू, असे एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे.

देशमुख, मलिक यांच्या जामिनाला ईडीची हरकत

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 10 जून रोजी राज्यसभा सदस्यांच्या निवडणुकीसाठी विधान भवनात मतदान करण्यास परवानगी देऊ नये, अशी भूमिका ईडीने विशेष पीएमएलए कोर्टात प्रतिज्ञापत्राद्वारे मांडली आहे. ईडीने विरोध दर्शवल्याने आता उद्या कोर्ट सुनावणीअंती काय निर्णय देते त्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘‘मलिक व देशमुख हे त्या-त्या मनी लॉण्डरिंग प्रकरणात मुख्य आरोपी आहेत आणि कैद्यांना लोकप्रतिनिधित्व कायद्यांतर्गत मतदानाचा हक्क नसतो. त्यामुळे एक दिवसाच्या तात्पुरत्या जामिनाबाबत दोघांनी केलेले अर्ज फेटाळून लावावेत,’’ असे ईडीने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

चारही उमेदवार निवडून येतील मुख्यमंत्र्यांचा विश्वास

महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून जातीलच असा विश्वास  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. राज्यसभेची शेवटची निवडणूक केव्हा झाली हे आपल्याला आठवावे लागत आहे. बिनविरोध निवडणुकीची  एक परंपरा पाळायला आपण हरकत नव्हती, असा टोलाही त्यांनी लगावला.