‘अज्ञात’… दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांचे अजामीनपात्र वॉरंट रद्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

सत्या, रंगीला या सारख्या प्रसिद्ध चित्रपटांचे दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांना न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. वॉरंट प्राप्त होताच वर्मा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के. के. कुरंदळे यांच्यासमोर हजर झाले. त्यांनी दंडाची रक्कम जमा केल्यामुळे वॉरंट रद्द करण्यात आले असून, या प्रकरणावर २० ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.

नूतन कॉलनी येथील मुश्ताक मोहसीन मुबारक हुसेन यांनी ‘जंगल में मंगल’ नावाची कथा लिहिली होती. या कथेवर रामगोपाल वर्मा यांनी ‘अज्ञात’ नावाचा चित्रपट तयार केला. त्यामुळे कलम ५१ प्रमाणे कॉपी राईट कायद्याचा भंग झाला, त्यांनी कथा चोरल्याचा आरोप करत कलम ६३ नुसार शिक्षा व्हावी, अशी विनंती न्यायालयात करण्यात आली. दरम्यान, २००९ मध्ये अज्ञात हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर २०१० मध्ये मुश्ताक यांनी न्यायालयात दावा दाखल करून रामगोपाल वर्मा यांना प्रतिवादी केले. या प्रकरणी न्यायालयाने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. या गुन्ह्यात त्यांना जामीन मिळाला होता. त्यानंतर वर्मा यांनी १२ जून २०१८ रोजी हजेरीमाफीचा अर्ज दाखल केला. मात्र, न्यायालयाने तो अर्ज नामंजूर करत वर्मांना प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहण्यासाठी वॉरंट बजावले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कैलास कुरंदळे यांच्यासमोर वर्मा हजर झाले.