पत्रकाराचे हत्या प्रकरण भोवले, राम रहीमला जन्मठेप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पंचकुला

सोळा वर्षांपूर्वी एका पत्रकाराच्या केलेल्या हत्येच्या प्रकरणात ‘डेरा सच्चा सौदा’चा प्रमुख राम रहीम याच्यासहित तीन जणांना पंचकुला येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्या चौघांना गेल्या शुक्रवारी दोषी ठरवण्यात आले होते.

राम रहीम याच्यासोबतच निर्मल सिंग, कुलदीप सिंग आणि क्रिशन लाल या तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली, असे सीबीआयचे वकील एचपीएस वर्मा यांनी सांगितले. 2002 सालात पत्रकार रामचंदर छत्रपती यांची हरयाणातील सिरसा येथे हत्या करण्यात आली होती. त्या प्रकरणात राम रहीमसहित चौघांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती जगदीप सिंग यांनी 11 जानेवारीला दोषी ठरवले होते, अशी माहिती त्यांनी दिली.

राम रहीम हा बलात्काराच्या प्रकरणात रोहतक येथील सुनारीया तुरुंगात 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा आधीपासून भोगत आहे. तर त्याचे तीन साथीदार अंबाला तुरुंगात आहेत. गेल्या शुक्रवारी सीबीआय न्यायालयाने दोषी ठरवण्याचा निकाल दिला तेव्हा ते चौघे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर झाले होते.

पत्रकार छत्रपतींची हत्या का करण्यात आली?
‘डेरा’च्या मुख्यालयात राम रहीम याने महिलांच्या केलेल्या लैंगिक शोषणाला पत्रकार रामचंदर छत्रपती यांनी वृत्तपत्रात वाचा फोडली होती. त्यानंतर ऑक्टोबर 2002 मध्ये त्यांची सिरसा येथे हत्या करण्यात आली. यासंदर्भात दाखल गुन्हय़ात डेराप्रमुख राम रहीम हा हत्येचा सूत्रधार असल्याचा आरोप करण्यात आला होता. पत्रकार छत्रपती यांच्या कुटुंबाने 2003 सालात पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे सोपवण्यात आले होते.