राजकीय युतीपेक्षा मूळ विचारधारा पक्की हवी!

2560

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मध्यंतरी वादग्रस्त अभिनेत्री कंगना राणावत हिची मुंबईत भेट घेतली. त्याआधी त्यांनी तिला पाठिंबाही जाहीर केला. कंगना हिने मुंबई आणि महाराष्ट्रविरोधी वक्तव्ये केली असल्याने आठवले यांच्या या भूमिकेवरून रिपब्लिकन वर्तुळात तीक्र पडसाद उमटले. कंगनाला पाठिंबा आणि आठवले यांनी वेळोवेळी बदललेल्या राजकीय भूमिका या पार्श्वभूमीवर एका कार्यकर्त्याने रामदास आठवले यांना लिहिलेले आणि मूळ विचारधारेबाबत जाणीव करून देणारे अनावृत्त पत्र.

माननीय रामदास आठवले,
केंद्रीय राज्यमंत्री.

हा मायना लिहिताना खूप छान वाटतंय. आमचा माणूस दिल्लीत राहतो, केंद्रीय राज्यमंत्री आहे. छान वाटते. अभिमान वाटतो. अतिशय गरिबीतून वर आलेला एक तरुण राजकीय क्षेत्रात येतो काय, वेगवेगळ्य़ा भूमिका बदलतो काय, आमदार, मंत्री, खासदार, केंद्रीय राज्यमंत्री बनतो काय! हे सगळे फिल्मी वाटायला लागते, पण ही सत्यकथा असल्याने मान्य करावे लागते. किती हलाखीत दिवस काढले आपण. मुंबईतील वडाळा येथील सिद्धार्थ विहार होस्टेलमध्ये आपण राहत होता. सिद्धार्थ विहार होस्टेल आठवतेय का तुम्हाला? आता ते पाडल गेलंय. बरीच वर्षे झाली तुम्ही त्या ठिकाणी फिरकलातसुद्धा नसाल. सिद्धार्थ विहार होस्टेल पुन्हा उभे करण्यासाठी काही तरी करा साहेब. जिथे आपली उमेदीचे वर्षे गेली त्यासाठी काहीतरी करा. तुम्ही सिद्धार्थ विहार होस्टेलमध्ये राहिलात. तिथे राहून मोर्चे, आंदोलने केली. आदरणीय माईसाहेब आंबेडकर यांच्यासोबत राहून आपण रिपब्लिकन चळवळीत शिरलात. तेथे तुम्ही असे बस्तान बसवले की तेव्हाचे आणि आजचे प्रस्थापित राजकीय नेते हे दुय्यमच राहिले. तुमचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. कोणासोबत राहिल्यावर आपल्याला पुढे सरकता येईल याचे उत्तम राजकीय ज्ञान आपल्याला आहे. तुम्ही पक्के राजकारणी झालात साहेब. राजकारणी होण्याला आमचा काहीच आक्षेप नाही. प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्याचे स्वप्न हे अंतिमतः आमदार, खासदार, मंत्री होण्याचेच असले पाहिजे. का असू नये? शेवटी सत्ता हीच सर्वश्रेष्ठ असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं होतं की, सत्ताधारी जमात व्हा. ते तुम्ही आचरणात आणलं, परंतु तुम्हाला सत्तेची अशी चटक लागली की, विचारू नका. सत्तेशिवाय तुम्ही राहूच शकत नाही असा संदेश सर्व पक्षांमध्ये गेला आहे. खरं सांगा, तुमचे मंत्रीपद, आमदारकी, खासदारकीमुळे आपल्या समाजाचे काय बरे झाले.

तुमचं सर्व राजकीय गणितच स्वकेंद्रित आहे. माझं काय? मला काय? याशिवाय तुमची राजकीय एक्सप्रेस कधी पुढे गेलीच नाही. तुमच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत एक किंवा फार तर दोन सहकाऱयांसाठी दोन चार महिन्यांसाठी आमदारकी, महामंडळाचे अध्यक्ष देण्यापलीकडे तुम्ही काय केले? सतत जयजयकार करणाऱया थोडय़ाबहुत कार्यकर्त्यांना मार्ग दाखविला म्हणजे संपूर्ण समाजाच्या हिताचे कार्य केले असे समजायचे का?

तुम्ही आमच्या समाजाचे अंबानी आणि अदानी, पण तुम्ही व्यक्तिशः किती शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे बांधली? ते डी. वाय. पाटील, पतंगराव कदम यांच्याकडून काही शिकायचे तरी होते.

राजकीय युती तुम्ही कोणाशी करावी यात काहीच वाद नाही. दुसरे राजकीय पक्ष कसेही वागू शकतात तर आमच्या माणसानेही केले तर आम्हाला वाईट का वाटावे? मात्र राजकीय युतीपेक्षा आपली मूळ विचारधारा पक्की पाहिजे हे महत्त्वाचे. आता तो तुमचा मित्र पक्ष भाजपचेच पहा. ते कश्मीरमध्ये पाकिस्तान समर्थक मुफ्ती मेहबूबासमवेत, उत्तर प्रदेशात बहेन मायावती यांच्यासोबत सत्ता स्थापन करतात. बिहारमध्ये कट्टर भाजप विरोधक नितीशकुमार यांच्याशी सत्तेसाठी युती करतात. पण हे सर्व करत असताना ते रेशीम बागेशी आपलं नातं तोडत नाहीत. रेशीम बागेत जाऊन ते सरसंघचालकांसमोर खाली बसतात. त्यांचे आशीर्वाद घेतात. चिंतन, मनन करतात. रामजन्मभूमीच्या पायाभरणीला न विसरता बोलावतात. आता तुम्ही म्हणाल की, आपल्याकडे अशी मातृ संघटना कुठे आहे? तर साहेब, हाच खरा प्रश्न आहे. अशी संघटना तयार करण्याचा तुम्ही आतापर्यंत कधी विचारसुद्धा का केला नाही? ज्या आपल्या मूळ मातृ संघटना आहेत त्यांनासुद्धा कधी मोठय़ा मनाने मोठे करण्याचा प्रयत्न केला नाही. उलट पीपल्स एज्युकेशन सोसायटीमध्ये अशा पद्धतीने घुसला की, ती सोसायटी तुम्हीच स्थापन केली होती. आता तुम्ही म्हणाल की, ही सोसायटी आमच्या सर्वांच्या बापाने म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केली आहे. प्रश्न असा पडतो की, आपल्या सर्वांच्या बापाने स्थापन केलेल्या संस्था किती काळ दाखवायच्या आम्ही?

तुमच्याशी पत्ररूपी संवाद साधण्याचे कारण असे की, तुम्ही महाराष्ट्र आणि मुंबईद्रोही कंगना राणावत हिची भेट घेतली. कशाला या भानगडीत पडता आपण? ही कंगना संविधानविरोधी आहे हे तुम्हाला माहीत आहे का? तिची आरक्षणाबद्दलची भूमिका माहीत आहे का? ती जातीयवादी आहे हो. अर्थात हे सगळं तुम्हाला कळत नाही असं समजायचं का आम्ही? तुम्ही राज्यमंत्री म्हणजे संपूर्ण देशाचे मंत्री आहात. मग मंत्र्यांना काही प्रोटोकॉल वगैरे असतो की नाही? कंगना तुम्हाला भेटायला आली पाहिजे की तुम्ही तिला भेटायला गेलं पाहिजे? ती मुंबईला पाकव्याप्त कश्मीर बोलली. तुम्ही सांगलीहून मुंबईत येऊन मोठे झालात. मग त्या मुंबईचा अवमान तुम्ही कसा सहन करू शकता? जीव तुटतो हो आमचा. तुम्ही स्वाभिमान कायम ठेवा. आम्ही गरिबीतही स्वाभिमानाने जगत आहोत.

बाकी त्या कंगनासोबत तुमची काय चर्चा झाली, म्हणजे काय ठरले याच्याशी आम्हाला काही देणे घेणे नाही. ते जाऊ द्या साहेब. एका डॉक्टर मित्राने विचारले की, चळवळीतील कबीर कला मंचची शाहीर, महिला कार्यकर्ती ज्योती जगताप हिला भीमा-कोरेगाव केसमध्ये एनआयएने तुरुंगात डांबले आहे. साहेब, तुमचे पंतप्रधान मोदी यांच्याशी चांगले संबंध आहेत. जरा तेवढे या कार्यकर्तीच्या जामिनाचे होईल तर बघा. तीसुद्धा एक महिलाच आहे.

आणखी एक, तुम्ही शेवटपर्यंत खासदारकी सोडायची नाही. ज्या वेळेस सोडावीशी वाटेल त्यावेळेस ती फक्त जित रामदास आठवले यालाच मिळाली पाहिजे. शपथ आहे तुम्हाला माझी.

जय भीम. नमो बुद्धाय. जय भारत.
धन्यवाद.

आपला धम्मबंधू ,
ऍड. विश्वास काश्यप ,
माजी पोलीस अधिकारी, मुंबई.

आपली प्रतिक्रिया द्या