हिंदू एकजुटीचे भक्कम पाऊल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>रमेश शिंदे<<

स्वयंभू हिंदू राष्ट्र असलेले भारतवर्ष हे स्वातंत्रप्राप्तीनंतर धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनले आणि हिंदू राष्ट्र ही तेजस्वी संकल्पना झाकोळून गेली. जेथे रामराज्य प्रत्यक्षात अवतरले, ते राज्य एक दंतकथा ठरवली गेली. छत्रपती शिवरायांनी स्थापिलेले हिंदवी स्वराज्य म्हणजेच हिंदू राष्ट्र विस्मृतीत नेऊन त्याला धर्मनिरपेक्ष राज्याच्या नावाखाली हिरवा रंग फासण्याचा खटाटोप केला गेला. त्याहीपुढे जाऊन आज हिंदू राष्ट्र म्हणजे धर्मांधता, असा अपप्रचार हेतूपूर्वक केला जात आहे. हिंदूंवरील अत्याचारांना वाचा फोडू पाहणाऱ्यांवर अश्लाघ्य आरोप केले जात आहेत. यासाठी केवळ राष्ट्रीय नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रथितयश प्रसारमाध्यमेदेखील कामाला लागली आहेत. त्यांच्याविरोधात लेख लिहिले जात आहेत. वर्ष २०१५ मधील दादरी हत्याकांड असो की नुकतेच घडलेले कठुआ प्रकरण असो. हिंदूविरोधी वातावरणाने संपूर्ण देशच ढवळून निघाला आहे.

प्रत्यक्षात सर्वात सहिष्णू, सर्वात सहनशील आणि सर्व समावेशकता हे गुण असणाऱ्यांना नि वसुधैव कुटुम्बकम्। ची शिकवण प्रत्यक्ष आचरणातून जगासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या हिंदूंना असहिष्णू ठरवण्यात येणे, हे खचितच दुर्दैवी आहे. धर्मनिरपेक्षतेचा बुरखा पांघरलेल्यांना हे लक्षात येत नाही की, धर्मनिरपेक्ष राज्य की हिंदू राज्य हा खरा प्रश्न नसून इस्लामी राज्य की हिंदू राज्य, असा प्रश्न येत्या काही वर्षांत उत्पन्न होणार आहे. अशा परिस्थितीत केवळ हिंदुत्वनिष्ठ किंबहुना राष्ट्रनिष्ठ असणारी प्रामाणिक विचारधाराच या देशाचे रक्षण करू शकते. आतंकवादासारख्या देशाच्या मुळावर उठलेल्या समस्यांच्या विरोधात कधी पाकशी वैचारिक अथवा धार्मिकदृष्टय़ा लागेबांधे असणारे बोलतात का? अराजकाची बिजे रोवणाऱ्या नक्षलवादाच्या विरोधात कधी साम्यवादाचा पुरस्कार करणारे बोलतात का? जेएनयूतील हिंदुस्थानविरोधी घोषणांच्या विरोधात अथवा सैन्यावर दगडफेक करणाऱ्या नि देशाच्या अखंडतेला आव्हान ठरणाऱ्या कश्मीरातील राष्ट्रद्रोह्यांच्या विरोधात कधी सेक्युलर ब्रिगेड बोलते का? किंबहुना अशा प्रसंगांत त्यांची तळी उचलताना ती धन्यता मानते. परंतु या आणि अशा अन्य राष्ट्रीय समस्या सुटाव्यात, याची कळकळ हिंदुत्वनिष्ठ संघटनांमध्ये का दिसून येते? प्रामाणिक आणि तार्किकदृष्टय़ा विचार करण्याची क्षमता असणाऱ्या प्रत्येकाला याचे उत्तर आपसूकच मिळेल.

आता एखाद्याला वाटेल की, हिंदू राष्ट्राची स्थापना ही राजकीय स्तरावर होणार आहे. हिंदू राष्ट्राची स्थापना खरेतर एक शास्त्राrय प्रक्रिया आहे. तेथे केवळ सत्याला स्थान आहे. प्रत्यक्षात हे एक आध्यात्मिक कार्य असून धर्माधिष्ठत अर्थात सत्यावर आधारित हिंदू राष्ट्र आम्हाला अभिप्रेत आहे. येथे त्याग, निःस्वार्थ भाव, सत्शीलता या दैवी गुणांनी सुसंपन्न अशा लोकांची आवश्यकता आहे. हिंदू राष्ट्राच्या आकांक्षा सफल होण्यासाठी हिंदू समाजाचा हिंदू राष्ट्राविषयीचा विचार, उच्चार आणि आचारही सर्वत्र एकसमान दिसला पाहिजे.

नेमक्या या कारणांसाठीच हिंदू जनजागृती समिती वर्ष २०१२ पासून अखिल भारतीय हिंदू अधिवेशनांचे आयोजन करून धर्माधिष्ठत हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्नरत आहे. हिंदू समाजातील विविध घटक, उदा. हिंदू संघटना, संप्रदाय, संत, अधिवक्ते, विचारवंत आदींनी हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी काय प्रयत्न केले पाहिजेत, याचे दिशादर्शन या हिंदू अधिवेशनांतून होत आहे. याद्वारे शेकडो हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे सिद्ध झालेले अभेद्य संघटन हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी एक आश्वासक पाऊल ठरत आहे.

यंदा म्हणजेच २ ते १२ जून या कालावधीत सप्तम् अर्थात सातवे अखिल भारतीय हिंदू अधिवेशन होणार आहे. हिंदुस्थानातील २५ राज्ये, तसेच नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका इत्यादी राष्ट्रांतील कार्यरत लहान-मोठय़ा अशा २५० हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी यंदाच्या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनातून स्फूर्ती घेऊन आगामी काळात हिंदू समाजाला येथील रामराज्याची अनुभूती देणारे हिंदू राष्ट्र स्थापन करण्यासाठी खारीचा नव्हे, तर हनुमानाचा वाटा उचलण्याची प्रेरणा व्हावी आणि त्याने या कार्यासाठी शारीरिक, मानसिक, बौद्धिक अन् आध्यात्मिक स्तरांवर अथक परिश्रम घ्यावेत, ही प्रभू श्रीरामाच्या चरणी प्रार्थना !

(लेखक हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत)