
गेले काही दिवस कोकणातील आंबोली परिसरात कोसळणाऱया पावसाने आजऱयाच्या हिरण्यकेशी नदीचे पात्र दुथडी भरून वाहू लागले आहे. त्यामुळे आजरा परिसरातील पर्यटकांच्या पसंतीचा रामतीर्थ धबधबाही जिवंत होऊन वाहू लागला आहे. त्याचे सौंदर्य पर्यटकांना सर्वांना खुणावू लागले आहे.
आजरा शहराला ओळख देणारा रामतीर्थ धबधबा शहरापासून जवळच हिरण्यकेशी काठावर वसला आहे. रामतीर्थ परिसराला चहुबाजूंनी लाभलेली हिरवीगर्द पार्श्वभूमी नानाविध प्रकारची वृक्षसंपदा, विविध पक्ष्यांचा अविरत किलबिलाट आणि या परिसरातील महादेव, श्रीराम, हनुमान, शिवशंकर आणि श्रीदत्त आदी देवतांची मंदिरेही सर्वांसाठी आकर्षण स्थळे ठरली आहेत.

























































