
मोालीतील लालडू येथे पोलीस आणि कबड्डीपटू कंवर दिग्विजन सिंह उर्फ राणा बलाचौरिया (वय – 30) यांच्या हत्याकांडातील आरोपीमध्ये चकमक उडाली. यात चकमकीदरम्यान पोलिसांच्या गोळीबारात एक गँगस्टर गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हरपिंदर सिंह उर्फ मिद्दू असे गँगस्टरचे नाव आहे. राणा बलाचौरिया यांच्यावर गोळीबार करणाऱ्या शूटर्समध्ये त्याचा समावेश नाही, मात्र हत्येचे षडयंत्र रचल्याचा आरोप त्याच्यावर आहे. दरम्यान, चकमकीदरम्यान दोन पोलीसही जखमी झाल्याची माहिती मिळते.
सोमवारी सायंकाळी कबड्डी सामना सुरू असताना भर मैदानात गोळीबार झाला होता. बोलेरोतून आलेले हल्लेखोर सेल्फीच्या बहाण्याने कबड्डीपटू कंवर दिग्विजन सिंह उर्फ राणा बलाचौरिया (वय – 30) यांच्या जवळ आले होते आणि अगदी जवळून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अवघ्या 10 दिवसांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती.
तीन संशयितांची ओळख पटली
मोहाली पोलिसांनी दोन शूटरसह या प्रकरणातील तीन संशयितांची ओळख पटवली आहे. हे तिघेही एका गँगचे सदस्य असून त्यांनी हत्येचे षडयंत्र रचल्याचे उघड झाले. ही गँग कबड्डी स्पर्धांवर आपले वर्चस्व राखण्याचा प्रयत्न करत होते. तसेच हे तुरुंगातील गँगस्टर जग्गू भगवानपुरिया याच्या जवळचे होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
5 वर्षात 12 खेळाडूंची हत्या
दरम्यान, कबड्डीमध्ये गेल्या काही वर्षात वर्चस्वाचा खुनी खेळ सुरू आहे. 2020 पासून कबड्डीशी संबंधित 12 खेळाडूंची आणि प्रमोटरची हत्या झाली आहे. जग्गु भगवानपुरिया गँग, लक्की पटियाल, गोल्डी बराड, लॉरेन्स बिश्नोई, कौशल गँग इतर शूटर यात सहभागी आहेत. कबड्डी स्पर्धेच्या नावाखाली विदेशातून मिळणाऱ्या फंडिंगसाठी ही लढाई सुरू असल्याचे निष्पन्न झाले आहे.



























































