
वारेमाप कर्जवाटप आणि वाढलेल्या थकीत कर्जामुळे बुडालेल्या येस बँकेचे चेअरमन राणा कपूर यांची अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) झाडाझडती सुरू केली आहे. कपूर यांच्या मुंबई आणि दिल्लीतील घरांवर धाडी टाकल्या असून, त्यांची अनेक तासांपासून कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान, धास्तावलेल्या येस बँकेच्या ग्राहकांना स्टेट बँकेने (एसबीआय) दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. येस बँकेतील 49 टक्के हिस्सेदारी एसबीआयकडून खरेदी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
रिझर्व्ह बँकेने गुरुवारी येस बँकेवर निर्बंध लादले आणि ग्राहकांना महिन्याला केवळ 50 हजार रुपयेच काढता येणार, असे जाहीर केले. बँकेच्या डबघाईला संचालक मंडळ आणि संस्थापक जबाबदार असल्याचा आरोप असल्याने ‘ईडी’ने तपास हाती घेतला. शुक्रवारी रात्री ईडीच्या अधिकाऱयांच्या पथकाने येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या मुंबईतील वरळी येथील निवासस्थानी धाड टाकली आणि त्यांची चौकशी सुरू केली. ईडीकडून महत्वाची कागदपत्रे आणि व्हिडीओ रेकॉर्ड्स जप्त करण्यात आले आहेत. तसेच राणा कपूर यांच्या दिल्लीतील निवासस्थानीही धाड टाकण्यात आली आहे. राणा कपूर आणि त्यांच्या पत्नीला देशाबाहेर जाण्यास प्रतिबंध घातले असून, लुकआऊट नोटीस बजावण्यात आली आहे.
मनी लॉण्डरिंग कायद्यांतर्गत गुन्हा
13 महिन्यांपूर्वी आपण व्यवस्थापकीय संचालकपद सोडले असे सांगत राणा कपूर यांनी काल हात झटकले होते. परंतु राणा कपूर यांच्या काळात कोटय़वधी रुपयांचे वारेमाप कर्जवाटप झाले. डीएचएफएल, सीसीडी, आयएल ऍण्ड एफएस अशा कंपन्यांना दिलेली कर्जे थकीत राहिली. त्याचवेळी परदेशातील पैसा कपूर यांनी वापरल्याचा संशय आहे. मनी लॉण्डरिंग कायद्यांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
‘एसबीआय’कडून येस बँक वाचविण्याचे प्रयत्न
येस बँक वाचविण्यासाठी देशातील सर्वांत मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाकडून (एसबीआय) प्रयत्न सुरू आहे. येस बँकेच्या ग्राहकांनी घाबरू नये, लवकरच त्यांच्या अडचणी दूर होतील, असे एसबीआयचे चेअरमन रजनीश कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
एसबीआयकडून येस बँकेचा 49 टक्के हिस्सा खरेदी करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती शेअर बाजाराला दिली आहे. कमीत कमी 26 टक्के हिस्सेदारी खरेदी केली तर एसबीआयला 2450 कोटी रुपये येस बँकेत गुंतवावे लागतील, असे रजनीश कुमार म्हणाले.
येस बँकेला 10 हजार कोटी रुपयांच्या कॅपिटलची गरज आहे.
रिझर्व्ह बँकेकडून येस बँकेसाठी ड्राफ्ट स्कीम तयार केली गेली आहे. एसबीआयची लीगल टीम यावर काम करीत आहे. सोमवारपर्यंत रणनीती तयार होईल, असे रजनीश कुमार यांनी सांगितले.
नोटाबंदीनंतर बुडीत कर्जात प्रचंड वाढ
8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक केलेल्या नोटाबंदीचा मोठा फटका बँकिंग क्षेत्रालाही बसला. येस बँकेच्या ‘एनपीए’मध्ये प्रचंड वाढ झाली. वारेमाप कर्जवाटप केले; पण वसुली झाली नाही आणि बुडीत कर्जाचे प्रमाण वाढत गेले.
ग्रॉस एनपीए – मार्च 2015 मध्ये 313 कोटी, 2016-748 कोटी, 2017-2018 कोटी, 2018-2626 कोटी आणि मार्च 2019 मध्ये 7882 कोटी.
नेट एनपीए – मार्च 2015 मध्ये 87 कोटी, 2016-284 कोटी, 2017-1072 कोटी, 2018-1312 कोटी, मार्च 2019 मध्ये 4484 कोटी रुपये.
‘एटीएम’मध्ये खडखडाट
आर्थिक संकटात येस बँक सापडल्याचा मोठा फटका ग्राहकांना बसला आहे. येस बँकेवर आरबीआयने निर्बंध लादले आहे. महिन्याला केवळ 50 हजार रुपये काढण्याचे बंधन टाकल्यामुळे ग्राहक हादरले आहेत. आपलेच पैसे गरज असतानाही काढता येत नाहीत यामुळे ग्राहक चिंतेत आहेत. गुरुवारी मध्यरात्रीपासून येस बँकेच्या एटीएमवर ग्राहकांची गर्दी होत आहेत. मात्र ‘एटीएम’मध्ये खडखडाट झाला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी पैसे बुडणार नाहीत, असा दिलासा दिला तरी ग्राहकांची चिंता कायम आहे.

























































