
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू करण्याच्या घोषणेला आज ४३ वर्ष पूर्ण झाली. या आणीबाणीविरोधात लढा देऊन लोकशाही मूल्यांचे संरक्षण करणाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मुंबईत आजोजित एका कार्यक्रमात सहभागी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. मोदींच्या वक्तव्यावर काँग्रेसने तुफान हल्ला चढवला. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना मुघल शासक औरंगजेबशी केली.
‘दिल्लीच्या गादीवर बसणाऱ्या औरंगजेबपेक्षाही क्रूर हुकुमशहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आज आणीबाणीचा धडा शिकवला. परंतु आज स्वत: त्यांनीच संपूर्ण जनतेला बंदी बनवलेले आहे’, असा जबरदस्त हल्ला सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यावेळी मोठी लढाई लढली होती. परंतु मोदी आणीबाणीची आठवण काढून देशातील नागरिकांना भ्रमीत करत आहेत. इंदिरा गांधी यांच्याबाबत चुकीचा प्रचार करून देशातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे? आणीबाणीची आठवण काढून देशामध्ये ‘अच्छे दिन’ येणार आहेत का? असा सवाल सुरजेवाला यांनी उपस्थित केला. तसेच औरंगजेबने तर फक्त आपल्या वडिलांना बंदी बनवले होते, परंतु आजच्या ओरंगजेबाने (पंतप्रधान मोदी) स्वपक्षासह संपूर्ण जनतेला बंदी बनवले आहे, अशी टीका सुरजेवाला यांनी केली.
Delhi sultanate ke Aurangzeb se bhi zyada kroor tanashah Modi ji ne desh ko 43 saal pehle ke aapatkal (Emergency) ka paath padhaya. Kya Congress par bhadaas nikaalne se Modi ji ke jumlon pe parda dal sakta hai?: Randeep Surjewala, Congress pic.twitter.com/fZRsdSfxHa
— ANI (@ANI) June 26, 2018
सुरजेवाला म्हणाले की, ‘पंतप्रधान मोदी यांनी आज आणीबाणीच्या काळातील एका एका वृद्ध महिलेचे उदाहरण दिलं. परंतु याच वृद्ध महिलेला नोटा बदलण्यासाठी रांगेमध्ये उभे राहावे लागले. सरकारला प्रश्न विचारणाऱ्या प्रत्येकाला देशद्रोही बोलले जात आहे. भाजपमध्ये ज्येष्ठांना किंमत नाही. लालकृष्ण आडवाणी यांना जबरदस्तीने बाजूला केले जात आहे’, या विरोधाभासी कृत्यांवरही त्यांनी बोट ठेवले.
निवडणुकीवेळी पंतप्रधानांनी दिलेल्या जुमल्यांचा उल्लेख करताना सुरजेवाला म्हणाले की, ‘मोदी आजही श्रीमंत आणि काही बड्या लोकांना फायदा पोहोचवण्यासाठी काम करत आहेत. विदेशातील काळे धन परत आणण्याच्या घोषणेचे काय झाले? १०० दिवसात ८० लाख कोटी देशात परत आले नाही, प्रत्येक वर्षी दोन कोटी लोकांना रोजगार देण्याची घोषणाही हवेत विरली अशी टीका त्यांनी केली. तसेच मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये देशामध्ये दलितांवरील अत्याचारात वाढ झाल्याचेही ते म्हणाले.
काय म्हणाले मोदी?
‘आणीबाणी लादली जाण्याचा निर्णय हा देशाच्या इतिहासातील काळा दिवस होता. ज्यांच्या पक्षात लोकशाही नाही ते लोक लोकशाहीची भाषा करत आहेत हे चकित करणारे आहे’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. तसेच आणीबाणीच्या काळात प्रत्येक संस्थेवर दबाव होता आणि भीतीचं वातावरण होतं, असेही मोदी म्हणाले.
























































