
पतीच्या निधनानंतर पश्चिम बंगालच्या रानाघाट रेल्वे स्टेशनवर गाणी गाऊन आपला उदरनिर्वाह करणाऱ्या रानू मंडल यांचा सुरेल आवाजातील गाण्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला अन् रातोरात त्यांचे नशीबच बदलले. नुकतीच रानू यांची मुलगीदेखील दहा वर्षांनंतर त्यांच्याकडे परतली आहे. मात्र रानू यांना मिळालेला पैसा आणि प्रसिद्धी यामुळे त्यांच्या मुलीला आई आठवल्याची टीका नेटिझन्सकडून होत आहे.
रेल्वे स्टेशनवरील रानू मंडल यांच्या ‘एक प्यार का नगमा है’ या गाण्याच्या व्हिडीओने बॉलीवूडलादेखील भुरळ घातली. नुकतेच संगीतकार हिमेश रेशमिया यांनी रानू यांच्याकडून आगामी चित्रपटासाठी ‘तेरी मेरी कहानी…’ हे गाणे गाऊन घेतले आहे. तेदेखील लोकप्रिय झाले आहे. आईची बॉलीवूडमध्ये एंट्री होताच त्यांची मुलगी त्यांच्याकडे धावत आली आहे. त्यामुळे नेटिझन्सने रानू यांच्या मुलीवर टीका केली आहे. दुसरीकडे मुलगी परतल्याने आपल्याला आनंद झाला असून नवीन आयुष्याला सुरुवात झाल्याची भावना रानू यांनी व्यक्त केली. रानू यांना प्रसिद्धीच्या झोतात आणलेल्या अतिंद्र चक्रवर्तीनेदेखील टीकाकारांना उत्तर दिले आहे. माझ्या एका व्हिडीओमुळे रानू यांची मुलगी त्यांना भेटली आहे. त्यामुळे आज मी खूप खूश असल्याचे अतिंद्र म्हणाला.


























































