रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी, तर रजनीश सेठ यांची MPSC च्या अध्यक्षपदी नियुक्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याच्या पोलीस दलात दोन मोठे बदल झाले आहेत. वादग्रस्त आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालकपदी वर्णी लागली असून वरिष्ठ आयपीएस अधिकारी रजनीश सेठ यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रश्मी शुक्ला या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत.

वरिष्ठ आयपीएस अधिकारी रजनीश सेठ हे पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत होते. येत्या डिसेंबर महिन्यात सेवानिवृत्त होणार होते; मात्र सेठ यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली असून त्यानंतर त्यांची एमपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तर आपल्या उलटसुलट कारभारामुळे वादग्रस्त ठरलेल्या रश्मी शुक्ला यांची राज्य शासनाने राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती केली आहे. मंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ट्विट करून ही माहिती दिली.

रश्मी शुक्ला या जून 2024 रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. तसे पाहता नियमानुसार अधिकाऱ्याला निवृत्तीसाठी कमी कालावधी असल्यास त्यांची प्रमुख पदावर नियुक्ती केली जात नाही; परंतु नियमबाह्य सरकार राज्यात आल्यापासून कुठल्याच बाबी नियमानुसार होत नसल्याचे चित्र आहे. आताही राजकीय हेतूने प्रेरित होऊन आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवत वादग्रस्त रश्मी शुक्ला यांना पोलीस दलाचे प्रमुख बनविण्यात आले आहे.