परभणीत वाढत्या तापमानामुळे भाज्यांचे भाव कडाडले

28

सामना प्रतिनिधी । परभणी

परभणी जिल्ह्यात एप्रिल आणि मे महिन्यात तापमानाने उच्चांकी गाठली आहे. एप्रिल अखेर आठवड्यात तापमानाच्या पाऱ्याने ४६ अंशापेक्षा अधिक वाढले होते. त्या पाठोपाठ मे महिन्याच्या पहिला आठवड्यातही दररोज तापमान ४२ अंशावर गेल्याने जिल्ह्यातील पाणी पातळीत कमालीची घट झाली. एकिकडे पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही. दुसरीकडे पाणी आणि तापमानामुळे पालेभाज्यांची आवक घटली आहे. परिणामी परभणीच्या बाजारापेठेत भाज्यांचे भाव कडाडले असल्याचे दिसून येत आहे. बाजारपेठेत सध्या सर्वच भाज्या ८० रुपये किलो या दराने विक्री होत आहेत.

परभणी शहरात मराठवाडा कृषी विद्यापीठासह ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची आवक होत असते. सततच्या वाढत्या तापमानामुळे भाज्यांचे दरही वाढल्या गेले आहे. लग्न सराई आणि वाढते तापमान यामुळे भाज्यांची मागणी अचानक वाढली. ही मागणी सध्या पूर्ण होत नसल्याने दर वाढले असल्याचे चित्र दिसून येत आहे. फुलकोबी, दोडका ८० रुपये किलो, मेथी, १०० रुपये किलो, हिरवी मिरची ८० रुपये किलो, कोथिंबीर १५० ते २०० रुपये किलो या दराने विक्री होत आहेत. त्याचबरोबर टमाटे हे नाशवंत पीक असल्यामुळे २० रुपये घट होऊन ६० रुपये किलो या दराने विक्री केल्या जात आहेत. गवार ८० रुपये, भेंडी व शिमला मिरची ८० रुपये किलो. कारले देखील ७० ते ८० रुपये किलोप्रमाणे विक्री केल्या जात आहेत. वांगी ४० तर कांदे, आलू २० रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहेत. काकडी ६०,
नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्यामुळे सर्वाधिक फटका हा आंबा या पीकास बसला आहे. त्यामुळे आंब्याच्या भावातही वाढ झाली आहे. कच्चा आंबा ४० रुपये किलो तर रसाचा आंबा ८० रुपये किलो या दराने विकल्या जात आहेत.

परभणीला अनेक तालुक्याच्या ठिकाणाहून वाहनाद्वारे भाजीपाला विक्रीसाठी आणला जातो. किरकोळ विक्रेते हा भाजीपाला घेऊन त्याची पूर्नविक्री करत असतात. त्यामुळे भाज्यांचे दरही वाढत आहेत. सध्या पाणीटंचाई ही सर्वांना भेडसावणारी बाब बनली आहे. पालेभाज्यांना सतत पाण्याच्या संपर्कात ठेवावे लागते. भाज्याची आवक घटल्याने व्यापारी चढ्या दराने या भाज्यांची विक्री करत असताना दिसून येत आहे. परभणी येथील बाजारापेठेत विविध ठिकाणाहून येणाऱ्या भाजपाल्यांची ठोक विक्री केल्या जाते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घट निर्माण झाल्याने भाज्यांच्या दरांमध्ये वाढ झाली असल्याचे बोलल्या जात आहे. तापमानाचा पारा सकाळी ७ वाजेपासूनच उग्र रुप धारण करत आहेत. त्यामुळे सकाळी ९.३० वाजेपर्यंतच यांची विक्री होत आहे. वाढत्या तापमानामुळे अनेकजण सकाळी ११ ते ४ दरम्यान घराबाहेर पडत नाहीत. परिणामी भाज्यांची विक्री ही सकाळी ६ ते ९.३० व सायंकाळी ७ ते ९ दरम्यान केली जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या