पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले अन् विजेचे वाढविले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डिझेल आणि पेट्रोलवरचे दर कमी केले, हे खरे असले तरी दुसऱ्या बाजूने विजेचे दर 20 टक्क्यांनी वाढवले आणि हे सांगायला ते जाणीवपूर्वक विसरले. एका बाजूने दिलासा द्यायचा आणि दुसऱया बाजूने जाणीवपूर्वक लोकांच्या खिशातून पैसा काढून घ्यायचा, असा हा सगळा प्रकार दिसत असल्याची टीका आमदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमधील पत्रकार परिषदेत केली आहे.

थोरात म्हणाले, ‘शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून महाविकास आघाडीने घेतलेले निर्णय बदलण्याचे काम केल्याचे दिसून येत आहे. मंत्रिमंडळ विस्तार गेल्या पंधरा दिवसांपासून रखडलेला आहे. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्याने मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचे सांगितले जात असले तरी याशिवाय त्यांच्यात वाद आहेत. त्यामुळेच हा मंत्रिमंडळ विस्तार रखडला. मुख्यमंत्री गडचिरोलीला गेले. मात्र, संपूर्ण महाराष्ट्रात पूरस्थितीमध्ये जवळपास 90 पर्यंत बळी गेलेले आहेत. या सगळ्या परिस्थितीचा आढावा दुर्दैवाने या नव्या सरकारने घेतलेला दिसत नाही.