
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधी अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित रथोत्सव भक्तिमय वातावरणात जल्लोषात संपन्न झाला. या रथोत्सवासाठी देशभरातील सुमारे 15 लाख भाविकांचा जनसागर उसळला होता. तीर्थक्षेत्र पुसेगाव नगरीतील सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. यावेळी श्री सेवागिरी महाराजांच्या जयघोषाने पुसेगावनगरी दुमदुमली होती.
पहाटे श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीची पूजा, अभिषेक व आरती मठाधिपती, चेअरमन व सर्व विश्वस्तांच्या हस्ते झाल्यावर महाराजांच्या पादुका व प्रतिमेची मानाच्या रथामध्ये प्रतिष्ठापना करण्यात आली. सकाळी 10 वाजता मठाधिपती श्री सुंदरगिरी महाराज, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता रथाचे पूजन करण्यात आले. रथयात्रेस सकाळी 11 वाजता सुरुवात झाली. ढोल-ताशांच्या गजरात सेवागिरी मंदिर ते सातारा-पंढरपूर रोडवरील यात्रा स्थळ या मुख्य मार्गावरून पोस्ट कार्यालय मार्गे रथयात्रा रात्री उशिरा पुन्हा मंदिरात आली. रथ मिरवणुकीत भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या दोन हजार, पाचशे, दोनशे, शंभर, पन्नास, वीस, दहा रुपयांच्या नोटांच्या माळांनी रथ सजवला होता. रथयात्रा बारा तास सुरू होती. मिरवणुकीत पुसेगाव व परिसरातील नामवंत बँडपथक सहभागी झाले होते.
यावेळी आमदार महेश शिंदे, शशिकांत शिंदे, जयकुमार गोरे, राहुल कुल यांच्यासह जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक समीर शेख, जि. प.चे सीईओ ज्ञानेश्वर खिलारी, चेअरमन बाळासाहेब जाधव, विश्वस्त गौरव जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव उपस्थित होते.
15 लाखांहून अधिक भाविकांची हजेरी
कोरोनामुळे दोन वर्षे रथोत्सव झाला नव्हता. त्यामुळे भाविक सेवागिरी यात्रेपासून पोरके होते. यंदा 10 लाख भाविकांचा सोहळा 15 लाखांवर गेला. त्यामुळे अवघी पुसेगावनगरी भाविकांच्या गर्दीने फुलली. यात्रेनिमित्त श्री सेवागिरी मंदिर विद्युत रोषणाईने चकाकत आहे. यात्रेत बालगोपाळांची खेळण्यांची दुकाने, सौंदर्य प्रसाधने, पाळणे, मिठाई, जिलेबी, फरसाण, स्वेटर, गृहोपयोगी वस्तूंची दुकाने व हॉटेल्स सजली आहेत. यात्रा काळात सहायक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
























































